बदल्यांनंतर प्रशासन आळसावले..! सामान्यांच्या तक्रारींकडे अधिकारी, कर्मचारी ढुंकूनही बघेनात | पुढारी

बदल्यांनंतर प्रशासन आळसावले..! सामान्यांच्या तक्रारींकडे अधिकारी, कर्मचारी ढुंकूनही बघेनात

हिरा सरवदे

पुणे : पुणे महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त आणि उपायुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर प्रशासन आळसावल्याचे चित्र सध्या शहरात आहे. शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे, खड्डे, राडारोडा, जागोजागी कचरा साचलेला दिसत आहे. पाणीटंचाईची समस्या गंभीर होत आहे. यासंदर्भात येणार्‍या तक्रारींकडे अधिकारी व कर्मचारी गांभीर्याने घेत नसल्याचा अनुभव नागरिकांना येत आहे.

लोकसभा निवडणूक होईपर्यंत आयुक्त विक्रम कुमार यांची बदली होणार नाही, असे बोलले जात होते. तशी खात्री विक्रम कुमार यांनाही होती. महापालिकेच्या स्थायी समितीची बैठक सुरू असतानाच अनपेक्षितपणे विक्रम कुमार यांची बदली केल्याचा आदेश अनपेक्षितपणे प्राप्त झाला. त्यानंतर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशाने अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे, डॉ. कुणाल खेमणार यांच्यासह अनेक उपायुक्तांच्या बदल्या झाल्या. महापालिका आयुक्त आणि एक अतिरिक्त आयुक्त यांची नियुक्ती झाली. मात्र, उर्वरित पदे अद्यापही रिक्त असल्याने त्या पदाचा कार्यभार इतर अधिकार्‍यांवर सोपविण्यात आला आहे.

शहरातील विविध रस्त्यांवर, पदपथांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे वाढली आहेत. माजी अतिरिक्त आयुक्त ढाकणे हे दररोज शहरात फिरून पाहणी करत होते. या पाहणीत आढळणारी अतिक्रमणे, रस्त्यावरील खड्डे, राडोरोडा, अनधिकृत फ्लेक्स तातडीने काढण्याच्या सूचना करत होते. त्याचा पाठपुरावा घेत होते. त्यांची बदली झाल्यानंतर याकडे कोणत्याही वरिष्ठ अधिकार्‍यांचे लक्ष नाही. अतिक्रमण विभागाकडे तक्रार केल्यानंतर कोणीही दखल घेत नाही. त्यामुळे रस्त्यावर पुन्हा व्यावसायिकांचे अतिक्रमण वाढले आहे. याशिवाय जागोजागी कचर्‍याचे ढीग, दुर्गंधी आणि रस्त्यांवर ड्रेनेजचे पाणी साचल्याचे पाहायला मिळत आहेत. दोन दोन आठवडे तुंबलेल्या ड्रेनेजकडे पाहिले जात नाही.

रस्त्यावर राडारोडा पडून

सेवा वाहिन्यांसाठी खोदाई करण्यास महापालिकेने सशुल्क परवानगी दिल्याने विविध ठिकाणी खोदाईची कामे सुरू आहेत. काम झाल्यानंतर तातडीने रस्ता बुजविणे, त्याच्यावर डांबरीकरण किंवा सिमेंट काँक्रिटीकरण करून रस्ता पूर्ववत करणे अपेक्षित असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. अनेक ठिकाणी राडोराडा जागेवरच पडून आहे.

सिंहगड रस्त्यावरील परिस्थिती पुन्हा ‘जैसे थे’

सिंहगड रस्त्यावर पदपथ सोडून व्यावसायिक व्यवसाय करतात. महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई मोहीम हाती घेतल्यानंतर परिस्थिती बर्‍यापैकी सुधारली होती. पदपथ सोडून रस्त्यावर बसणारे व्यावसायिक पदपथावर गेले होते. मात्र, आता प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने पुन्हा व्यावसायिक रस्त्यावर व्यवसाय थाटत आहेत. पु.ल. देशपांडे उद्यानाच्या प्रवेशद्वारावर डबल पार्किंगप्रमाणे एकाच्या पुढे एक व्यवसाय सुरू आहेत. वडगाव येथील कालव्याच्या पुलावर मोठ्या प्रमाणात टेम्पो उभे करून फळभाज्या आणि वस्तू विक्री केल्या जातात. गोयल गंगाच्या चौकात पुन्हा खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत क्षेत्रीय कार्यालयांच्या अधिकार्‍यांकडे तक्रारी केल्यानंतरही काहीच कारवाई होत नाही.

अपुरे मनुष्यबळाचे कारण देत कामचुकारपणा

अधिकार्‍यांच्या बदल्या होणे, ही प्रशासनामध्ये काही कालावधीनंतर घडणारी प्रक्रिया आहे. मात्र, महापालिकेतील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या झाल्यानंतर संपूर्ण प्रशासनच आळसल्याचे चित्र शहरात पाहायला मिळत आहे. त्यातच निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती झाली आहे. याचाच फायदा घेऊन उर्वरित कर्मचारी अपुरे मनुष्यबळाचे कारण देत कामचुकारपणा करत आहेत.

हेही वाच

Back to top button