पुणे : पुढारी वृत्तसेवा : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. मागील अडीच वर्षांपासून जिल्हा व सत्र न्यायालयात या खटल्याचे कामकाज सुरू होते. ते आता पूर्ण झाले असून येत्या 10 मे रोजी खटल्याचा निकाल लागणार आहे. या घटनेतील आरोपींना शिक्षा होते की ते निर्दोष सुटतात, याकडे राज्यातील सर्वांचे लक्ष लागले आहेत.
मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले असताना 20 ऑगस्ट 2013 या दिवशी महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर डॉ. दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. खुनाच्या तब्बल आठ वर्षांनी हा खून खटला सुरू होण्यास मुहूर्त लागला. सुरुवातीच्या काळात पुणे पोलिस या खुनाचा तपास करत होते.
त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आदेशावरून जून 2014 मध्ये या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्यात आला. 15 सप्टेंबर 2021 रोजी डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चित करण्यात आले, त्यानंतर खटल्याला सुरुवात झाली. जवळपास अडीच वर्षांपासून हा खटला चालू आहे. या खटल्याची सुनावणी आता पूर्ण झाली आहे.
सुरुवातीला या खटल्याची सुनावणी वर्षभर जिल्हा न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुरू होती. त्यानंतर नावंदर यांची बदली झाल्याने सध्या पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरू आहे. सीबीआयचे वकील प्रकाश सूर्यवंशी यांनी या प्रकरणात वीस साक्षीदार तपासले. बचाव पक्षाचे वकील प्रकाश साळसिंगीकर, वीरेंद्र इचलकरंजीकर आणि सुवर्णा आव्हाड यांनी काम पाहिले. त्यांनी दोन साक्षीदार न्यायालयात उभे केले.
भारतीय दंडसंहिता (आयपीसी) कलम 302 (हत्या), 120 (बी) (गुन्ह्याचा कट रचणे), 34 नुसार आणि शस्त्र अधिनियम संबंधित कलमांतर्गत आणि यूएपीएअंतर्गत तावडे, अंदुरे, कळसकर आणि भावे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे हे दोन आरोपी सध्या जामिनावर बाहेर आहेत.
हेही वाचा