तर द्रौपदीचा विचार करावा लागेल..: अजित पवारांचे विधान चर्चेत | पुढारी

तर द्रौपदीचा विचार करावा लागेल..: अजित पवारांचे विधान चर्चेत

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : आपल्या भागाला विकास निधी देण्यासाठी मी कमी पडणार नाही. मात्र, तुम्हीही मतदान करायला गेल्यावर मशिनमध्ये देखील आमच्या उमेदवाराच्या समोरचं बटन दाबा कचा कचा कचा; म्हणजे मला पण निधी द्यायला बरे वाटेल, नाहीतर माझा पण हात आखडता होईल, असा दमच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इंदापूरमधील सभेत दिला. उपमुख्यमंत्री अजित पवार हे इंदापुरात डॉक्टर, व्यापारी, वकील संघटनेच्या बैठकीमध्ये बोलत होते.

या वेळी पवारांनी कधी वादग्रस्त, तर कधी मिश्कील वक्तव्य केली. या वेळी आमदार दत्तात्रय भरणे,मोहोळ तालुक्याचे आमदार यशवंत माने, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम व आरोग्य सभापती प्रवीण माने, प्रतापराव पाटील, डॉ.शशिकांत तरंगे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे इंदापुरात येऊन त्यांनी जिल्हा बँकेचे संचालक अप्पासाहेब जगदाळे व कर्मयोगीचे उपाध्यक्ष भरत शहा, निरा-भीमाचे उपाध्यक्ष कांतीलाल झगडे यांच्यासह अनेकांचा पक्षप्रवेश करून घेत शक्तिप्रदर्शन केल्याने अजित पवार यांनी बुधवारी थेट सकाळी इंदापूर गाठले व डॉक्टर, वकील, व्यापारी यांच्या भेटीगाठी घेत संवाद साधला.

डॉक्टरांच्या बैठकीत द्रौपदीची आठवण

इंदापुरात डॉक्टरांच्या बैठकीत डॉक्टरांनी सरकारी यंत्रणेमधील काही जाचक अटी कमी करण्याची मागणी केली. यावर उत्तर देताना अजित पवार म्हणाले, सरकारी यंत्रणेकडून तुम्हाला त्रास होत असेल. काही ठिकाणी सोनोग्राफी सेंटरला मानसिक त्रास दिला जात असेल, परंतु बीडच्या घटना आणि पाठीमागील काळात हजार मुलांच्या पाठीमागे 850 मुलींचा जन्मदर पाहता पुढे पुढे तर द्रौपदीचा विचार करावा लागेल की काय, असा प्रश्न पडतो अशी मिश्कील टिप्पणी करत निश्चित आपण केलेल्या मागण्यांचा विचार केला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आश्वासित केले.

हेही वाचा

Back to top button