

बारामती; पुढारी वृत्तसेवा : माढा मतदारसंघातील अनेक लोक मला भेटले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेतून मोहिते-पाटील यांचे नाव पुढे आले आहे. येत्या दोन दिवसांत धैर्यशील मोहिते-पाटील यांचा प्रवेश होईल. त्यानंतर पक्षाकडून उमेदवारीची अधिकृत घोषणा होईल, असे सांगत माढ्याचा उमेदवार मोहिते-पाटील घरातीलच असेल, असे स्पष्ट संकेत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी दिले. बारामतीत ते पत्रकारांशी बोलत होते. (Lok Sabha Election 2024)
पवार म्हणाले की, माढ्यासंबंधीचा आमचा विचार सुरू आहे. काही प्रस्ताव आले आहेत. गुरुवारी माळशिरस, अकलूज भागातील अनेक सहकारी भेटले. त्यांनी धैर्यशील मोहिते-पाटील यांचे नाव दिलेे आहे. यासंबंधीचा निर्णय येत्या एक-दोन दिवसांत होईल. पक्षाचे अध्यक्ष आणि काही वरिष्ठ नेते अकलूजला जातील. पहिल्यांदा पक्ष प्रवेश होईल. पक्षप्रवेश झाल्याशिवाय उमेदवारी जाहीर करता येत नाही. ती जाहीर करण्याची जबाबदारी आम्हा लोकांवर आहे. (Lok Sabha Election 2024)