इंदापुरात चारापीक लागवडीवर भर; चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सतर्क! | पुढारी

इंदापुरात चारापीक लागवडीवर भर; चाराटंचाईच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सतर्क!

बावडा : पुढारी वृत्तसेवा : इंदापूर तालुक्यात दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणावर आहे. तालुका दुधाचे आगार म्हणून ओळखला जात आहे. त्यामुळे संभाव्य चारा टंचाईवर मात करण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी मकवान, कडवळ आदी चारा पिकांची लागवड केली आहे.
दुग्धव्यवसाय तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केला जात असल्याने हिरव्या चार्‍यास दूध उत्पादकांकडून मोठी मागणी असते. अनेक शेतकरी मुरघासाची लागवड करतात. उन्हाळ्याचे आणखी दोन महिने बाकी आहेत. त्यामुळे हिरव्या चार्‍याची मागणी कायम राहणार असल्याने मकवान, कडवळ यांची लागवड केल्याचे शेतकरी गणेश घोगरे, अंकुश घाडगे (बावडा), काशिनाथ अनपट (लाखेवाडी), रणजित खाडे (शहाजीनगर) व दूधगंगा दूध संघाचे संचालक दयानंद गायकवाड (बोराटवाडी) यांनी सांगितले.

उपलब्ध क्षेत्रावर चारा पिकाची लागवड करून आगामी काळात जनावरांच्या चा-याचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न शेतकरी करीत आहेत. यंदा तालुक्यात चा-याची व पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणविण्याची शक्यता आहे. शेतीला जोड म्हणून अनेक शेतकरी दुग्धव्यवसाय करतात. दूध व्यवसायामुळे शेतक-यांना आर्थिक आधार मिळाला आहे. त्यामुळे अनेक शेतक-यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार चारा पिके घेतली आहेत. दरम्यान, सध्या दुधाचे दर घसरल्याने व्यवसाय फारसा किफायतशीर राहिला नसल्याचे निरा भीमा कारखान्याचे संचालक प्रतापराव पाटील (निरनिमगाव), राजेंद्र देवकर (रेडा), राहुल कांबळे (खोरोची), किरण पाटील (चाकाटी) यांनी सांगितले.

कडब्याऐवजी मकवानाच्या गंजी!

पूर्वी गोठ्याशेजारी ज्वारीच्या कडब्याच्या गंजी दिसून येत. मात्र, अलीकडे वाढलेल्या ऊस क्षेत्रामुळे रब्बी ज्वारी पिकासाठी क्षेत्र अत्यल्प राहिले आहे. त्यामुळे आता गोठ्याशेजारी कडब्याऐवजी मकवानाच्या गंजी दिसून येत आहेत, असे दूध उत्पादक शेतकरी भारत लाळगे (सराफवाडी) यांनी सांगितले.

हेही वाचा

Back to top button