दुष्काळग्रस्त तालुक्यांना केंद्राचा 161 कोटींचा दिलासा..! | पुढारी

दुष्काळग्रस्त तालुक्यांना केंद्राचा 161 कोटींचा दिलासा..!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मागील वर्षी कमी पाऊस झाल्याने केंद्राच्या नियमानुसार पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता. केंद्रीय पथकाने या तालुक्यांना भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी देखील केली होती. त्यानुसार केंद्राने जिल्ह्यासाठी 161 कोटी 20 लाख 75 हजार रुपयांचा निधी दिला आहे. हा निधी बाधित शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यात जमा केला जात आहे.
पावसाने ओढ दिल्याने जिल्ह्यातील सात तालुके दुष्काळाच्या छायेत आले होते. या तालुक्यांत कमी पर्जन्यमान झाले असल्याने पिकांची वाढ कमी झाली होती.

त्यामुळे या सात तालुक्यांमधील पिकांचे पंचनामे जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. मात्र, केंद्राच्या निकषानुसार, यापैकी पाच तालुक्यांतच दुष्काळ जाहीर करण्यात आला. केंद्रीय पथकाने पुणे दौर्‍यावर येऊन प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर याबाबतचा अहवाल केंद्राकडे सादर केला होता. त्यानुसार पुरंदर, सासवड, बारामती, शिरूर, घोडनदी, दौंड आणि इंदापूर या तालुक्यांसाठी हा निधी प्राप्त झाल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.

या पाच तालुक्यांत जिरायत क्षेत्र 79 हजार 124.98 हेक्टर क्षेत्र आहे, तर बागायत क्षेत्र 61 हजार 370.01 एवढे आहे. तसेच बहुवार्षिक पिके 5471.1 हेक्टर क्षेत्रावर आहेत. जिरायत 8500, बागायत 17 हजार, तर बहुवार्षिक पिकांसाठी प्रतिहेक्टरी 22 हजार 500 अशी मदत दिली जाणार आहे. या बाधित क्षेत्रातील शेतकर्‍यांची संख्या दोन लाख 49 हजार 484 एवढी आहे. संबंधितांच्या खात्यात जमा करण्यात येत आहे, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

हेही वाचा

Back to top button