जलसंकटाच्या झळा ! कुणी पाणी देता का पाणी..! आंबेगावच्या जनतेचा टाहो

जलसंकटाच्या झळा ! कुणी पाणी देता का पाणी..! आंबेगावच्या जनतेचा टाहो

लोणी-धामणी : पुढारी वृत्तसेवा : राज्यात लोकसभा निवडणुकीचा प्रचाराचा ज्वर वाढत असताना आंबेगाव तालुक्यातील पूर्व भागातील दुष्काळी पट्ट्यात मांदळेवाडी, वडगावपीर, लोणी धामणी, पहाडदरा, शिरदाळे आदी गावांमध्ये दुष्काळाची दाहकता मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. या गावांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या भागातील तलाव, ओढे, नाले, विहिरी, विंधन विहिरी आटल्याने टँकरने पाणीपुरवठा केला जात असला तरीही कडाक्याच्या उन्हात नागरिकांना पाण्यासाठी दाही दिशा वणवण करण्याची वेळ आली आहे. शासनाने काही ठिकाणी पाण्याचे टँकर सुरू केले आहेत, मात्र पाणी कमी पडत असल्याने टँकरच्या फेर्‍या वाढवाव्यात अशी मागणी दुष्काळग्रस्त भागातील लोक करू लागले आहेत. मार्च महिन्यापासून तापमानात जलद वाढ झाल्याने दुष्काळग्रस्त भागातील जलस्रोताचे पाणी लवकरच आटले आहे.

आगामी काळात तर तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. जनावरांसाठी चारा छावण्या व पाण्यासाठी राज्यकर्त्यांनी लोकसभा निवडणुकीचा विसर पडू न देणे गरजेचे आहे. शासनाने जलजीवन मिशनसारख्या योजना राबवून पाणीटंचाईवर मात करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यात फारसे यश मिळाल्याचे दिसत नाही. काही ठिकाणी योजना अपूर्ण अवस्थेत आहेत. तर काही ठिकाणी पूर्ण झाल्या पण पाणीपुरवठा सुरू झाला नाही. त्यामुळे कोट्यवधी रुपये खर्चूनही नागरिकांना पाणी… पाणी करावे लागते, याला जबाबदार कोण ?
लोकसभा निवडणुकीच्या गदारोळात सर्वांनी दुष्काळाकडे दुर्लक्ष केले आहे. कोंबडा झाकला म्हणून सूर्य उगवायचा थांबत नाही, या म्हणीप्रमाणे सर्वांनी दुर्लक्ष केले म्हणून दुष्काळी पट्ट्यातील परिस्थिती बदलत नाही. आगामी दोन-तीन महिन्यांत दुष्काळी भागांत जगणं मुश्किल होणार आहे. त्यासाठी तातडीच्या उपाययोजना होणे आवश्यक आहेत.

म्हाळसाकांत प्रकल्पाला चालना द्यावी

लोणी धामणी परिसरातील दुष्काळ संपविण्यासाठी म्हाळसाकांत प्रकल्पाला चालना मिळावी, अशी मागणी या भागातील शेतकरी करू लागले आहेत. भविष्यात हा प्रकल्प सुरू झाला तर या भागातील पाण्यासाठी करावा लागणार संघर्ष थांबेल, अन्यथा पाण्यासाठी येथील नागरिकांना स्थलांतराशिवाय पर्याय नाही.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news