Sassoon Hospital | उंदीर चावल्याप्रकरणी दोषींवर कारवाई होणार? | पुढारी

Sassoon Hospital | उंदीर चावल्याप्रकरणी दोषींवर कारवाई होणार?

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे वैद्यकीय शिक्षण विभागाने ससून सर्वोपचार रुग्णालयाच्या प्रशासनावर उंदीर चावल्याप्रकरणी कारवाई करण्याची शिफारस करणारा अहवाल राज्य सरकारला सादर केला. चौकशी समितीच्या अहवालानंतर कारवाईची शिफारस करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. वेल्ह्यातील 30 वर्षीय सागर रेणुसे यांना 17 मार्च रोजी जुन्या रुग्णालयाच्या इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या आयसीयूमध्ये पुलावरून पडल्याने दाखल करण्यात आले होते. ट्रॉमा सेंटरमध्ये रुग्णाला उंदीर चावल्यामुळे मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली होती. तीन सदस्यीय समितीने ससून रुग्णालयाला भेट दिली आणि वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाला (डीएमईआर) अहवाल सादर केला. मृत रुग्णाच्या शरीरावर उंदराच्या चाव्याच्या खुणा दिसून आल्याची शिफारस अहवालात करण्यात आली आहे. शवविच्छेदन अहवालातदेखील याचा उल्लेख करण्यात आला होता आणि तपासणीदरम्यान रुग्णालय प्रशासनाने त्यास सहमती दर्शविली होती. हजारो गरजू रुग्ण उपचारासाठी रुग्णालयात येतात आणि त्यांना दर्जेदार उपचार देणे ही रुग्णालय प्रशासनाची जबाबदारी आहे. त्यामुळे दोषींवर लवकरात लवकर कारवाई होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

रुग्णाच्या नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला होता. रुग्णालय व्यवस्थापन आणि संबंधित डॉक्टरांवर एफआयआर दाखल करण्याची मागणी केली होती. मृताच्या नातेवाईकांनी अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. समितीच्या अहवालानंतर आता रुग्णालयामध्ये पेस्ट कंट्रोल करण्यासाठी नेमलेल्या एजन्सीवर या संदर्भात कारवाई करण्याच्या दिशेने हालचाल सुरू असल्याचे समजते.

समितीने सादर केलेल्या तपासणी अहवालातील निष्कर्षांनुसार ससून प्रशासनात कोणी दोषी आढळल्यास कारवाईसाठी राज्य सरकारकडे शिफारस पाठवण्यात आली आहे.

डॉ. दिलीप म्हैसेकर, वैद्यकीय शिक्षण संचालक

हेही वाचा

Back to top button