अबब..! ‘दहा हजार किलोंची मिसळ’ : महात्मा फुले जयंतीनिमित्त उपक्रम | पुढारी

अबब..! ‘दहा हजार किलोंची मिसळ’ : महात्मा फुले जयंतीनिमित्त उपक्रम

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मटकी 1000 किलो, कांदा 800 किलो, आले 200 किलो, लसूण 200 किलो…असे विविध साहित्य वापरून तब्बल दहा हजार किलोंची मिसळ तयार करण्यात आली अन् क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त तयार केलेल्या या तर्रीबाज मिसळवर हजारो पुणेकरांनी ताव मारला. महात्मा फुले वाड्यात अभिवादनाकरिता आलेल्या पुणेकरांना मिसळ वाटण्यात आली. 15 बाय 15 फूट आणि 6.5 फूट उंच अशा 2500 किलो वजनाच्या भव्य कढईमध्ये ही झणझणीत मिसळ तयार करण्यात आली आणि अबब इतकी किलो मिसळ असे आश्चर्याचे भाव अनेकांच्या चेहर्‍यावर होते. हजारो किलोची मिसळ तयार होताना आणि तयार झाल्यानंतरचे क्षणचित्र पुणेकरांनी मोबाईल कॅमेर्‍यातही क्लिक केले. मिसळचा आस्वाद विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी घेतला.

हा आगळावेगळा उपक्रम क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समितीतर्फे गंज पेठेतील महात्मा फुले वाडा येथे राबविण्यात आला. अयोध्येत तब्बल 7 हजार किलोंचा विश्वविक्रमी शिरा साकारण्याकरिता वापरलेल्या कढईत प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी ही 10 हजार किलो मिसळ तयार केली. गुरुवारी पहाटे तीन वाजता त्यांनी मिसळ तयार केली आणि सकाळी सात वाजता मिसळ वाटण्यास सुरुवात झाली. सायंकाळपर्यंत मिसळ वाटप सुरूच होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी आदींनी उपक्रमाला भेट देत मिसळचा आस्वादही घेतला. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक इच्छुक काही उमेदवारांनीही कार्यक्रमस्थळी भेट देत मिसळवर ताव मारला. प्रल्हाद गवळी, श्रीधर चव्हाण, नंदा पंडित, सारंग सराफ, रवी चौधरी, सुशीला नेटके आदींनी उपक्रमाच्या संयोजनात सहभाग घेतला.

आंबेडकर जयंतीदिनीही होणार मिसळ वाटप

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (दि.14) पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथेदेखील 10 हजार किलोंची मिसळ अभिवादनाकरिता येणार्‍या बांधवांना वाटप करण्यात येणार आहे. सकाळी 7 पासून हे वाटप केले जाईल.

हेही वाचा

Back to top button