तमाशातील वगनाट्ये झाली कालबाह्य : तमाशाकलेला उतरती कळा | पुढारी

तमाशातील वगनाट्ये झाली कालबाह्य : तमाशाकलेला उतरती कळा

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : उत्तर पुणे जिल्ह्यातील गावोगावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा-जत्रांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. या यात्रांचे मुख्य आकर्षण म्हणजे रात्री करमणुकीसाठी लोकनाट्य तमाशा. गेल्या पाच ते सहा वर्षांत तमाशाचे स्वरूपच बदलून गेले आहे. समाजप्रबोधन करणार्‍या वगनाट्यांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे वगनाट्ये कालबाह्य होण्याच्या मार्गावर आली आहेत, तर तमाशातील पारंपरिक गणगवळण, विनोदी फार्स हे कार्यक्रम धावत्या स्वरूपात सादर होऊ लागले आहेत. ग्रामीण भागात पारंपरिक तमाशाला मोठी प्राचीन परंपरा आहे. लोकमनोरंजनातून लोकशिक्षण देणार्‍या तमाशा कलेला आता उतरती कळा लागल्याचे दिसू लागले आहे. सध्याचा मोबाईल, रिमिक्स जमाना यामुळे पारंपरिक तमाशाचे स्वरूपच बदलून गेले आहे.

ढोलकीचा खणखणाट, हलगीचा कडकडाट आता पहिल्यासारखा ऐकू येत नाही. त्यांची जागा आता ऑक्टोपॅड, ऑर्गन या आधुनिक वाद्यांनी घेतली आहे. पूर्वी तमाशातील गणगवळण पाहण्यासाठी लोक गर्दी करायचे. परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपासून गणगवळण अक्षरश: धावत्या स्वरूपात घ्यावी लागत आहे. याचा परिणाम त्या गायकांवर झाला आहे. त्यांना तमाशा फडमालकांकडून मागणी नाही.
कोरोनापूर्व काळात वगनाट्ये पाहण्यासाठी मोठी गर्दी व्हायची. सामाजिक, कौटुंबिक, पौराणिक, देशभक्तीपर, सत्य घटनांवर आधारित वगनाट्ये सादर व्हायची. यातून हुंडाबळी, स्त्री-भ्रुणहत्या या विषयांवर वगनाट्यांतून प्रबोधन व्हायचे. शासनाच्या विविध योजना समाजातील तळागाळातील घटकांपर्यंत पोहोचविण्यासाठी या वगनाट्यांचा उपयोग व्हायचा. परंतु आता वगनाट्ये कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहेत.

तमाशाला कोरोना भोवला

आधीच प्रेक्षकांच्या आवडी-निवडी बदलल्या असतानाच तीन वर्षांपूर्वी आलेल्या कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका तमाशालाच बसला. कोरोनात अनेक फडमालक, गुणी तमाशा कलावंत मरण पावले. सर्वच फडमालकांची पुरेपूर वाताहत झाली. त्या धक्क्यातून अनेक फडमालक अद्यापही सावरलेले नाहीत.

हेही वाचा

Back to top button