जागतिक साखर परिषद : इंधन प्रश्‍नात ऊस ठरेल गेम चेंजर | पुढारी

जागतिक साखर परिषद : इंधन प्रश्‍नात ऊस ठरेल गेम चेंजर

पुणे ; पुढारी वृत्तसेवा : ‘जगात ब्राझील देशात इंधनामध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 27 टक्क्यांइतके आहे. युरोपमधील देशांसह ऊस उत्पादक सर्व देशांनी इथेनॉल उत्पादन वाढविणे गरजेचे आहे. एवढेच नाही, तर जगातील इंधनांवरील उपाययोजनांमध्ये ऊस पीकच गेमचेंजर ठरेल,’ असे महत्त्वपूर्ण मतही नुकत्याच झालेल्या जागतिक साखर परिषद येथे व्यक्‍त करण्यात आल्याचे साखर आयुक्‍त शेखर गायकवाड यांनी सांगितले.

लंडन येथे 23 ते 26 नोव्हेंबरदरम्यान जागतिक साखर परिषद झाली. तीत 43 साखर उत्पादक देशांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. या वेळी परिषदेच्या कार्यकारिणीवरील दहा प्रतिनिधींची निवड करण्यात आली. ही कार्यकारिणी जागतिक व्यापार धोरणात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. या परिषदेत केंद्र सरकारच्या अन्न मंत्रालयातील सहसचिव सुबोधसिंग, गायकवाड यांनी सहभाग घेतला. आंतरराष्ट्रीय करारान्वये उभारण्यात आलेली ही संस्था आहे. जगातील सोयाबीन, कॉफी आणि साखरेसह अन्नधान्य प्रक्रियेचा आढावाही बैठकीत घेण्यात आला.

‘इलेक्ट्रिक वाहनांना इथेनॉलचा उत्तम पर्याय असून, जगातील इंधनांवरील उपाययोजनांमध्ये ऊस पीकच गेमचेंजर ठरेल,’ असे मत परिषदेत व्यक्‍त करण्यात आले. ‘ऊस, अन्नधान्य आणि बिटापासून इथेनॉल उत्पादन मिळविण्यावर सर्वच देशांनी भर द्यायला हवा. डी कार्बनायझेशनवर चर्चा होताना इलेक्ट्रिसिटी कोळशावर चालल्यास पर्यावरणाचे नुकसान होण्यास कारणीभूत ठरेल. उसाच्या बगॅसपासून चमचे, प्लेट आदींचाही विचार करण्यात यावा,’ असे मतही या वेळी तज्ज्ञांनी व्यक्‍त केल्याचे त्यांनी सांगितले.

परिषदेत गायकवाड यांनी देश आणि महाराष्ट्रातील ऊस गाळपाची स्थिती, साखर उत्पादन, इथेनॉल निर्मितीबाबत माहिती दिली.

गायकवाड म्हणाले, ‘भारत सरकारकडून साखर निर्यातीला अनुदान दिले जाते. जागतिक बाजारात साखरेचा क्‍विंटलचा दर 3300 रुपयांपर्यंत आहे. या दरात आता अनुदान देण्याची गरज राहिलेली नाही, तरीसुद्धा 2021-22 या वर्षात भारतातून जागतिक बाजारात सुमारे 70 लाख टनाइतक्या साखरेची निर्यात अपेक्षित आहे. भारतातून सुमारे 30 लाख टनाइतक्या कच्च्या साखर निर्यातीचे करार झाले असून, त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 18 लाख टनाइतका आहे.’

देशभरातून सुमारे 450 कोटी लिटरइतक्या इथेनॉल पुरवठ्याचे टेंडर भरले गेले असून, महाराष्ट्रातील वाटा सुमारे 120 कोटी लिटरच्या आसपास आहे. राज्यातील ऊस गाळप अधिकाधिक इथेनॉलकडे वळवून सुमारे 10 लाख टनांवरून 12 लाख टनाइतके साखर उत्पादन कमी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे चालू वर्षी महाराष्ट्रातील साखरेचे उत्पादन 122 लाख टनांवरून 12 लाख टनांनी कमी होऊन ते 110 लाख टनांइतकेच ठेवण्याचे नियोजन केल्याची माहिती परिषदेत दिल्याचे त्यांनी सांगितले.

साखर निर्यातीस अनुदान नको

जागतिक बाजारात साखर निर्यात करताना भारताने निर्यातीला अनुदान देऊ नये, अशी मागणी परिषदेत अनेक देशांच्या प्रतिनिधींनी केली. भारताने शंभर टक्के असलेले साखरेवरील आयात शुल्क कमी करावे तसेच भारताने जास्तीत जास्त मळी आयातीला परवानगी द्यावी, अशीही मागणी विविध देशांच्या प्रतिनिधींनी परिषदेत केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

Back to top button