

न्हावरे : पुढारी वृत्तसेवा : न्हावरे (ता. शिरूर) येथील शाळेच्या चौकात पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत एका कारमध्ये एक लाख 75 हजार चारशे रुपयांच्या नकली नोटा आढळल्या. न्हावरे पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. अजय विनायक गुट्टे (वय 23, रा. कोरेगाव एशियन चौक, ता. शिरूर), विष्णू भानुद्रास गुट्टे (वय 29, रा. वाघोली बायफ रोड, ता. हवेली),गोविंद दौलत गुट्टे (वय 22, रा. शास्त्री चौक, भोसरी, पुणे सर्व मूळ रा. गुट्टेवाडी, ता. परळी, जि. बीड), बबलू विद्याधर रावळ (वय 23, रा. सनगरादिया, पटना गंजम, ओडिसा) अशी त्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्हावरे शाळेच्या चौकात मंगळवारी (दि.9) पहाटे साडेचारच्या सुमारास पोलिसांनी संशयास्पद कार अडवली. सहायक पोलिस उपनिरीक्षक गोपीनाथ चव्हाण, अण्णासाहेब कोळेकर, स्वप्निल सूळ, भरत पवार यांनी गाडीतील चौघांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सुमारे एक लाख 75 हजार चारशे रुपयाच्या शंभर, दोनशे व पाचशे रुपयांच्या बनावट चलनी नोटा आढळल्या. गाडीत दारूच्या बाटल्या, नशेचे पदार्थ आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली. याप्रकरणी तपास शिरूरचे पोलिस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अभिजित पवार करीत आहेत.
हेही वाचा