पुण्यात धांगडधिंगा सुरूच : पोलिस आयुक्तांच्या आदेशाला पबवाल्यांकडून ठेंगा | पुढारी

पुण्यात धांगडधिंगा सुरूच : पोलिस आयुक्तांच्या आदेशाला पबवाल्यांकडून ठेंगा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : हॉटेल्स आणि पबसंदर्भात पोलिस आयुक्तांनी नियमावली तयार केली. रात्री दीडपर्यंत त्यांना परवानगी देण्यात आली. याबाबत 144 चे आदेश देखील लागू करण्यात आले. मात्र, पबवाल्यांनी चक्क पोलिस आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत रात्री दीडनंतरही आपला धांगडधिंगा सुरू ठेवल्याचे समोर आले आहे. सोमवारी रात्री सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने येरवडा परिसरातील एलोरा आणि युनिकॉर्न या दोन पबवर कारवाई करून दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांत आठ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.

पहिल्या गुन्ह्यात कल्याणीनगर येथील आयटी पार्कमधील सेरेब्रममध्ये आठव्या मजल्यावर एलोरा रूफ टॉप हॉटेल कम पब आहे. शहरातील सर्व पबला रात्री दीडपर्यंत पब सुरू ठेवण्याची परवानगी आहे. असे असताना देखील दीड वाजल्यानंतरही पब सुरू ठेवला. यामध्ये मोठ्याने साउंड सिस्टीम वाजवून रहिवाशांना त्रास दिला. यामध्ये सामाजिक सुरक्षा विभागाने 17 लाखांची साउंड सिस्टीम, 3 लाख 87 हजारांचे हुक्का फ्लेव्हर, हुक्का पॉट असे साहित्य जप्त केले. याप्रकरणी अमन इदा शेख (विकासनगर कॉलनी, कलवड वस्ती, लोहगाव), संदीप हर्षवर्धन सहस्रबुद्धे (रा. शिवाजीनगर), रश्मी संदेश कुमार (रा. औंध) आणि सुमीत चौधरी (रा. लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या पबवर रात्री दीड ते पहाटे पावणे सहापर्यंत कारवाई सुरू होती.

याच आयटी पार्कमधील सेरेब्रमच्या आठव्या मजल्यावर युनिकॉर्न हाऊस पब आहे. या ठिकाणीही मोठ्या आवाजात साउंड सिस्टीम सुरू असल्याचे पोलिसांना निदर्शनास आल्यानंतर येथून साडेसात लाखांची साउंड सिस्टीम, 41 हजारांचे हुक्क्याचे साहित्य असा तब्बल 7 लाख 91 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यांनी देखील वेळेपेक्षा अधिक काळ पब सुरू ठेवल्याने ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी प्रफुल्ल बाळासाहेब गोरे (वय 30, रा. येरवडा), संदीप हर्षवर्धन सहस्रबुद्धे (रा. शिवाजीनगर), रश्मी संदेश कुमार (रा. औंध) आणि सुमीत चौधरी (रा. लोहगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अप्पर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, राजेश माळेगावे, अमय रसाळ, सागर केकाण, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ यांच्या पथकाने ही कारवाई केली.

हेही वाचा

Back to top button