पुणे बनतय अपहरणाच शहर : सव्वातीन वर्षांत 1 हजार 866 जणांचे अपहरण

पुणे बनतय अपहरणाच शहर : सव्वातीन वर्षांत 1 हजार 866 जणांचे अपहरण

पुणे : दोन वर्षांपूर्वी बालेवाडीतील चिमुरड्या डुग्गुच्या अपहरणाचा थरार डोळ्यासमोर असतानादेखील ही बाब खरंच गांभीर्याने घेतली गेली का, याबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. विद्येचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या पुण्यातून मुला-मुलींचे विविध कारणांतून अपहरण होण्याचे प्रमाण वाढले आहे. भाग्यश्री सुडे या कॉलेज तरुणीचा खंडणीसाठी अपहरण करून खून केल्याची घटना ताजी आहे. याच धर्तीवर पुण्यातील अपहरण प्रकरणांचा आढावा घेतला असता सव्वातीन वर्षांत पुण्यातून 18 वर्षांखालील तब्बल 1 हजार 866 मुला- मुलींचे अपहरण (बेपत्ता) झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

जानेवारी 2021 ते मार्च 2024 दरम्यान अपहरण झालेल्यांपैकी 154 मुले-मुली पोलिसांना सापडली नसल्याचे वास्तवदेखील या निमित्ताने समोर आले आहे. 18 वर्षांवरील मुला- मुलींचे अपहरण होण्याचे प्रमाणदेखील अधिक आहे. अठरा वर्षांखालील मुलगा किंवा मुलगी बेपत्ता झाली की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात येतो. शहरात सव्वातीन वर्षांत अशा पद्धतीचे 1 हजार 866 गुन्हे दाखल झाले. त्यात मुलींची संख्या 1 हजार 428 आहे. तर मुलांची संख्या 438 आहे. आतापर्यंत पोलिसांना 1 हजार 290 मुली, तर 422 अपहरण झालेल्या मुलांपर्यंत पोहचता आले. मात्र, यातील गंभीर बाब म्हणजे पोलिसांना अपहरण झालेल्या 138 मुली, तर 16 मुले अद्यापपर्यंत सापडलीच नाही.

जानेवारी 2021 ते मार्च 2024 दरम्यान अपहरण झालेल्यांपैकी 154 जण सापडले नसल्याचे वास्तव समोर

तक्रारी प्रलंबित

चॉकलेट किंवा खाऊचे आमिष दाखवून मुलांना पळविले जाते. त्या मुलांना त्यांचे हात- पाय तोडून भिकेला लावले जात असल्याची उदाहरणे यापूर्वी घडली आहेत. मात्र, मुलगा- मुलगी प्रेमप्रकरणातून, इतर कारणांवरून पळून गेल्यानंतर ते बेपत्ता/अपहरण झाल्याची तक्रार नोंद होते. परंतु, चूक समजल्यानंतर ते घरी आल्यानंतर त्याबाबत पुन्हा पोलिस ठाण्यात वेळोवेळी माहिती दिली जात नाही. त्यामुळेही असे गुन्हे मुले-मुली सापडूनदेखील काहीवेळा प्रलंबित राहतात.

ही कारणे बेपत्ता/अपहरणाची

  • काही प्रकरणांमध्ये खरंच पैशासाठी अपहरण
  • घरातील वादातून मुले घर सोडून निघून जातात
  • सामाजिक माध्यमे, चित्रपटांत रंगविलेले आभासी जग
  • तरुण-तरुणींच्या प्रेमात कुटुंबीयांचा अडसर होत असेल तर पळून जाणे
  • घरातील रुढी-परंपरा मान्य नसल्याने बेपत्ता
  • पतीच्या त्रासाला कंटाळून घर सोडून निघून जाणे
  • शिक्षणाची भीती, अभ्यासासाठी दबाव
  • बाह्यजगाचे आकर्षण
  • स्वतंत्र जीवन जगू इच्छिणारे
  • महिला व मुलींची तस्करी
  • मानवी तस्करीसाठीही अपहरण

पालकांनी घ्यायची काळजी

पालकांनी मुला-मुलींचे मोबाईल वेळोवेळी तपासण्याची गरज आहे. त्याबरोच मुलांच्या मित्र-मैत्रिणींची माहिती ठेवण्याची आवश्यक आहे. चित्रपट मालिकांमध्ये गुन्ह्यांचे दृश्य दाखविले जाते. याचा परिणाम मुलांच्या मनावर होतो. त्याप्रमाणेच ते अनुकरण करण्याचा व चुकीच्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतात. मुले वयात आली की त्यांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटते. त्यामुळेदेखील मुले घर सोडून जातात. त्यामुळे मुले आणि पालक यांच्यात संवाद असणे आवश्यक आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news