स्टुडिओ अपार्टमेंटची रिअल इस्टेटमध्ये ‘चलती’ | पुढारी

स्टुडिओ अपार्टमेंटची रिअल इस्टेटमध्ये 'चलती'

दिगंबर दराडे

पुणे : पुण्यामध्ये परदेशातील घरांच्या धर्तीवर छोट्या छोट्या ऑफिस कम घर अशा स्टुडिओ अपार्टमेंटची कन्सेप्ट सध्या वाढू लागली आहे. कमीत कमी गुंतवणुकीमध्ये अधिकाधिक मोबदला घेण्याकरिता आयटी कंपन्यांच्या शेजारी स्टुडिओ अपार्टमेंटची संख्या वाढताना दिसत आहे.  कमीत कमी बजेटमध्ये अपार्टमेंट शोधत असणार्‍या नागरिकांना याचा लाभ होतो. आकाराने लहान असल्याने स्टुडिओ अपार्टमेंट स्वच्छ करणे आणि देखभाल करणे सोपे जाते. आयटीमधील तरुण-तरुणींना अशा छोट्या अपार्टमेंटचा अधिकचा फायदा होत असल्याने त्यांचा याकडे कल वाढताना दिसत आहे. प्रामुख्याने खराडी, हिंजवडी, बाणेर, बालेवाडी या परिसरात या अपार्टमेंट वाढताना दिसत आहेत. या प्रकारची घरे सुरुवातीला परदेशात अधिक प्रमाणात होती.
आता मात्र ही घरे पुणे परिसरात वाढू लागली आहेत.  स्टुडिओ अपार्टमेंटमध्ये सर्वकाही एकाच खोलीत असल्याने बहुकार्य करणे सोपे होते. स्वयंपाक करताना किंवा टीव्ही शो  पाहताना अपार्टमेंट स्वत: स्वच्छ करता येते. लहान जागेत असल्याने कमीत कमी खर्चापासून अधिक खर्चापर्यंत या जागा उपलब्ध होत आहेत. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना हौसिंग फायनान्सच्या सोप्या ईएमआयच्या ऑफर्स मिळल्याने अनेक जण गुंतवणुकीकडे वळले आहेत. अनेक आर्थिक संस्था ईएमआयचे वेगवेगळे पर्याय देत असल्याने ग्राहकांसाठी पर्वणी ठरत आहे.
सणाच्या शुभ दिवशी घरखरेदी करणार्‍या ग्राहकांची संख्या गेल्या काही वर्षांत चांगलीच वाढली आहे. अधिकाधिक ग्राहकांनी यादरम्यान घरखरेदी करावी, यासाठी अनेक विकासक/बिल्डर्स नवनवीन ऑफर्स आणि डिस्काउंटच्या स्किम्स घेऊन येतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे.  या काळात अनेक विकासक/बिल्डर्स मोफत वस्तू, आकर्षक ऑफर्स आणि डिस्काउंट घेऊन येत असल्यामुळे ग्राहकांसाठी हा कालावधी चांगलाच फायद्याचा ठरत आहे.  घर खरेदी करू इच्छिणार्‍या अधिकाधिक ग्राहकांनी  गुढीपाडव्याचा मुहूर्त साधला आहे. सणाच्या मंगलमय वातावरणात खरेदी केलेली वास्तू घरात आर्थिक समृद्धी आणते, अशी सर्वसाधारण धारणा आहे.

अनेकांनी उभारली  घरखरेदीची गुढी

 गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत अनेकांनी घर, ऑफिस बुकिंगवर भर दिला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. यंदा रेडिरेकनरचा दर वाढला नसल्याने घरांच्या किमतीमध्ये फारसी वाढ झाली नसल्याचे वास्तव समोर आले आहे. 4000 हजार रुपये ते 12,000 हजार रुपयांपर्यंत प्रत्येक स्वेअरफूटचा दर झाला आहे. बाणेर, हिंजवडी, बावधान, खराडी, उंड्री, हडपसर परिसरातील घरांना चांगली वाढ आहे.

 स्टुडिओ अपार्टमेंट वाढतील

सुरुवातीच्या काळात स्टुडिओ अपार्टमेंट पुणे शहर आणि परिसरात कमी होत्या. मात्र, पुण्यामध्ये आयटी कंपन्या वाढल्यानंतर यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. आयटीपार्क सोडून देखील भविष्यात या अपार्टमेंट हार्ट ऑफ सिटीतही वाढतील.
– विशाल गोखले, बांधकाम व्यावसायिक

हेही वाचा

Back to top button