

पुणे : पुढारी वृत्तसेवा : क्रेनच्या मदतीने खांब काढताना क्रेनचा हूक डोक्यात पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (दि. 3) सकाळी साडेअकराच्या सुमारास नाना पेठेतील डोके तालीम चौक परिसरात घडली होती. याप्रकरणी समर्थ पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पांडुरंग अमृतराव म्हस्के (वय 35, सध्या रा. धनकवडी, मूळ रा. जालना) असे मृत्युमुखी पडलेल्या कामगाराचे नाव आहे. रेवण तुळशीदास नाथ (वय 28, रा. गाडीतळ, हडपसर), फय्याज इद्रीस अहमद ऊर्फ इम्तियाज (वय 24, रा. मंगळवार पेठ), सीमा जांभळे (वय 45, रा. येरवडा), बाबू शिंदे (रा. धनकवडी), योगेश बबन म्हस्के (रा. शेवाळवाडी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस उपनिरीक्षक अक्षयकुमार गोरड यांनी समर्थ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. नाना पेठेतील डोके तालीम परिसरात पथदिव्याचा खांब काढण्याचे काम बुधवारी (दि. 3) सकाळी करण्यात येत होते. संबंधित काम ठेकेदाराकडे सोपविण्यात आले होते. इलेक्ट्रिसियन असलेले म्हस्के ठेकेदाराकडे कामाला होते. जांभळे क्रेन सर्व्हिस यांच्यामार्फत खांब काढण्याचे काम सुरू होते. हे काम पूर्ण झाल्यानंतर म्हस्के हे साहित्य गोळा करत होते. अचानक क्रेनचा लोखंडी हूक तुटून म्हस्के यांच्या डोक्यात पडला. म्हस्के यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.
म्हस्के हे साहित्य गोळा करत असताना क्रेनवरील चालक व इतर आरोपींनी क्रेनच्या हूकला जोडलेली वायर चांगली आहे की नाही, याची खातरजमा केली नाही. तरीही ती कामासाठी वापरली. तसेच, कामाच्या ठिकाणी सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही सुरक्षेची साधने पुरवली नाहीत. पांडुरंग म्हस्के काम करत असल्याचे माहीत असतानाही त्याकडे दुर्लक्ष करून क्रेनचा हूक वर खेचला. त्यामुळे हूक तुटून म्हस्के यांच्या डोक्यात पडून त्यांचा मृत्यू झाला.
हेही वाचा