शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करा; शालेय शिक्षण विभागाचे निर्देश | पुढारी

शाळापूर्व तयारी अभियानाची अंमलबजावणी करा; शालेय शिक्षण विभागाचे निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक वर्ष 2024-25 नुसार पहिलीमध्ये दाखल होणार्‍या बालकांसाठी ’शाळापूर्व तयारी अभियानाची’ यशस्वी अंमलबजावणी करा, असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने दिले आहेत. शाळास्तरावर शाळापूर्व तयारी पहिला मेळावा एप्रिल महिन्यात तर दुसरा जून महिन्यामध्ये आयोजित करण्यात यावा. दोन्ही मेळाव्यादरम्यान 1 ते 8 आठवडे बालकांची शाळापूर्व तयारी पालकांकडून करून घ्यावी. याकरिता शिक्षक, अंगणवाडी सेविका, स्वयंसेवकांनी मदत करावी, अशा सूचना शिक्षण विभागातर्फे देण्यात आल्या आहेत.
राज्यस्तरावर एकदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार आहे.

प्रशिक्षण सकाळी 10 ते 2 या कालावधीत झूमच्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने दिले जाणार आहे. जिल्हास्तरावरील प्रशिक्षणासाठी एकदिवसीय कार्यशाळेसाठी प्रतिप्रशिक्षणार्थी 1000 रुपये जेवण, चहा, कार्यशाळेसाठी बॅनर व पोस्टर, कार्यशाळेसाठी लागणारी स्टेशनरी, प्रवास भत्ता व सुलभक मानधन यासाठी खर्च करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रशिक्षणाचे आयोजन वेळापत्रकाप्रमाणे प्राचार्य यांनी संबंधित गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या समन्वयाने करावे. जिल्हास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे तालुकास्तरावर तज्ज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करतील.

केंद्रस्तरावर दिनांक 13 एप्रिल 2024 रोजी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर प्रशिक्षण घेतलेले व्यक्ती हे केंद्रस्तरीय प्रशिक्षणासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक / सुलभक म्हणून काम करतील. मेळावे आयोजन करणेबाबतचे नियोजन पर्यवेक्षकीय अधिकारी व शाळांना कळवावे. गटशिक्षणाधिकारी व बालविकास प्रकल्प अधिकारी यांनी सर्व शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख तसेच अंगणवाडी पर्यवेक्षिका यांची सभा घेऊन शाळास्तरावरील मेळावा 1 व 2 चे नियोजन करावे. दैनंदिन शालेय कामकाजाच्या वेळेत मेळाव्याचे आयोजन करण्यात यावे. मेळाव्याचा कालावधी साधारणपणे 4 तासांचा असावा. शाळेचे वातावरण प्रसन्न व आरोग्यदायी असावे. मेळाव्यामध्ये पहिलीला दाखलपात्र सर्व बालके व त्यांचे पालक यांनी सहभागी व्हावे, असेही निर्देश शिक्षण विभागातर्फे देण्यात आले आहेत.

हेही वाचा

Back to top button