दुष्काळाच्या झळा आता तमाशाच्या बुकिंगलाही..

दुष्काळाच्या झळा आता तमाशाच्या बुकिंगलाही..

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : यंदा राज्यात दुष्काळसदृश स्थिती असल्याने तमाशाची बारी बुकिंगवर परिणाम झाला आहे. नारायणगावचे तमाशा पंढरीमध्ये सुमारे 35 फड मालकांनी कार्यालये थाटली आहेत. दरवर्षी या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात फड मालक आपली कार्यालये उभारतात. मार्च ते जून हे चार महिने विविध गावच्या यात्रा असल्याने तमाशाच्या बारीला सुगीचे असतात. यंदाच्या वर्षी राज्यात दुष्काळी स्थिती असल्याने तमाशा बारीच्या बुकिंगवर परिणाम झाला आहे. दुष्काळी स्थितीचा परिणाम यात्रा वर्गणीवर होत असल्याने गावची यात्रा तर आहे परंतु तमाशाचा खेळ ठेवायचा का नाही? असा विचार गावची यात्रा कमिटी करते. त्यातच स्वस्तात एखादा तमाशा मिळाला तर बघू असा प्रयत्न होतो.

तमाशा नगरीत तमाशाची बारी ठरवायला आलेले यात्रेकरू अगदी कमी दरात तमाशाची बारी ठरवण्याचा प्रयत्न करतात. यंदा दुष्काळ आहे, गावात वर्गणी गोळा होत नाही. आमचा यंदा यात्रा उत्सव करण्याचा विचार नाही. साध्या पद्धतीने यात्रा भरवणार आहोत. तथापि फडमालकांचे व कलाकारांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही इथे बारी ठरवायला आलोय. बारी स्वस्तात मिळाली तर तमाशा ठेवू अशी मानसिकता विविध यात्रा कमिटींची पाहायला मिळते.

एकंदरीत यंदाच्या वर्षी असणारी दुष्काळी परिस्थिती तमाशा कलाकारांसाठी अडचणीची ठरत आहे. 50 हून अधिक कलाकार, इतर कारागीर व कामगार असा सुमारे 100 लोकांचा लवाजमा फडमालकांच्या सोबत असतो. दुष्काळी परिस्थिती असल्याने तमाशाची बारी ठरवताना यात्रा कमिटीचे लोक कमी दरामध्ये बारी ठरविण्याचा प्रयत्न करीत असल्याने या कलाकारांना मानधन द्यायचे कसे? असा सवाल फडमालक विचारीत आहेत.

अंजली नाशिककर या फडाचे मालक संभाजीराजे जाधव म्हणाले, तमाशाला यंदाच्या वर्षी सुगीचे दिवस राहतील अशी आम्हाला अपेक्षा असल्याने कलाकार व इतर कामगारांना मोठ्या प्रमाणात उचल देऊन यंदाच्या वर्षी आम्ही तमाशाची बारी उभी केली आहे. परंतु, दुष्काळी परिस्थिती असल्याने विविध गावच्या यात्रा कमिटीचे प्रमुख तमाशा बुकिंग करायला आल्यावर कमी दरात तमाशा मिळावा अशी मागणी करतात. यंदा दुष्काळ आहे. आम्हाला सांभाळून घ्या. पुढच्या वर्षी जास्त पैसे देऊ अशी गळ ते घालतात. कमी दरात आम्ही तमाशाची सुपारी घेतली तर दुसर्‍याकडून घेतलेले पैसे कसे फेडायचे, कामगारांचा पगार कसा द्यायचा? असा प्रश्न आमच्या समोर उभा ठाकला आहे.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news