अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनाला फटका! कैर्‍यांच्या प्रमाणात घट | पुढारी

अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनाला फटका! कैर्‍यांच्या प्रमाणात घट

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : जुन्नर तालुक्यामध्ये आंब्याच्या बागा मोठ्या प्रमाणात आहेत. परंतु, यंदाच्या वर्षी आंब्याला मोहर आल्यानंतर पाऊस पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात मोहर गळती झाली. तसेच ढगाळ वातावरणाचादेखील मोठ्या प्रमाणात फटका बसला. त्यामुळे यंदाच्या वर्षी आंब्याचे उत्पादन घटणार आहे. जुन्नर तालुक्यामध्ये येणेरे, पारुंडे, वडज, शिंदे राळेगण, कुसुर या गावांमध्ये आंब्याच्या बागा अधिक प्रमाणात आहेत. यामध्ये पायरी, लंगडा, हापूस, केशर, दशेरी, आम्रपाली, सिंधू, नीलम, रत्ना, राजापुरी, तोतापुरी आदी प्रकारच्या आंबा बागांचा समावेश आहे.

वर्षातून एकदाच येणारे हे फळपीक असल्यामुळे आंब्याचे उत्पादन चांगले यावे यासाठी शेतकरी विशेष काळजी घेत असतो. परंतु, यंदाच्या वर्षी तीन महिन्यांपूर्वी काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला, तर ढगाळ वातावरण नेहमीच असल्यामुळे आंब्याचा मोहर मोठ्या प्रमाणात गळून गेला. त्यामुळे यंदा आंब्याचे उत्पादन अधिक घटणार आहे.

येणेरे परिसरात आंब्याची लागवड मोठ्या प्रमाणात आहे. यंदाच्या वर्षी निसर्गाचा लहरीपणा आंबा उत्पादकांना अडचणीत आणणार आहे. गेल्या दोन वर्षापासून निसर्गाचे नियोजन पूर्णपणे बदलले आहे. उन्हाळ्यात पाऊस, तर पावसाळ्यात हिवाळा आणि हिवाळ्यात उन्हाळा असे विचित्र निसर्गाचे चित्र बदललेले आहे. त्यातच आंब्याच्या फवारणीचा खर्च, अवकाळी पाऊस आणि ढगाळ वातावरणामुळे गळालेला मोहोर यामुळे यंदा उत्पन्नावर परिणाम होणार आहे.

– रामभाऊ ढोले, प्रगतशील आंबा उत्पादक

हेही वाचा

Back to top button