Loksabha election : उमेदवारांबरोबर मुद्देसुद्धा तेच..! शेतकर्‍यांना भावनिक करण्याचा प्रयत्न | पुढारी

Loksabha election : उमेदवारांबरोबर मुद्देसुद्धा तेच..! शेतकर्‍यांना भावनिक करण्याचा प्रयत्न

साहेबराव लोखंडे

टाकळी हाजी : शेतकर्‍यांच्या समस्यांविषयी लोकांना भावनिक बनवून त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुद्दे मांडले जातात की त्यांच्या जखमांवर मीठ चोळतात, हेच शेतकर्‍यांना कळायला तयार नाही. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरूर मतदासंघातील उमेदवारांचा प्रचार सुरू झाला असून, गावभेट दौर्‍यात शेतकर्‍यांच्या भेटीगाठी घेऊन त्यांच्याविषयी सहानुभूतिपूर्वक विचार मांडण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. शिरूर लोकसभेच्या पहिल्या निवडणुकीवेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शेतकर्‍यांच्या ज्या मुद्द्यांना लक्ष्य करून प्रचार केला, त्यातील अनेक मुद्दे आजही नव्याने मांडले जात आहेत.

तर, दुसरीकडे कधीही शेतकर्‍यांच्या बांधावर न दिसलेले डॉ. अमोल कोल्हे हे शेतकर्‍यांसमवेत शेतात बसून केंद्र सरकारचे कृषी धोरण शेतकर्‍यांच्या विरोधी असल्याची आगपाखड करीत आहेत. निवडणूक आली की शेतकरी लगेच डोळ्यांसमोर दिसतो आणि निवडणूक संपली की हाच शेतकरी नजरेआड केला जातो, अशा प्रतिक्रिया शेतकर्‍यांमधून उमटत आहेत. चार माहिन्यांपूर्वी शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्यात अवकाळी पावसासह गारपीट झाली. मात्र, त्या वेळी हे आजी-माजी खासदार तिकडे फिरकलेही नाहीत. आज त्याच शेतकर्‍यांच्या हमीभाव, नुकसानभरपाई, पीक कर्ज व्याजमाफी आदी मुद्द्यांवर प्रचाराचे रणांगण गाजविण्याचा केविलवाणा प्रयत्न मात्र यांच्याकडून सुरू आहे. आज कोणत्याही शेतमालाला चांगला भाव मिळत नाही. कांदा काढणीचा हंगाम सुरू असून, बाजारभाव पडल्याने भांडवलसुद्धा वसूल होत नाही, अशी अवस्था झाली आहे.

गत पंचवार्षिक निवडणुकीत प्रचारादरम्यान यातील एक उमेदवार शिरूर तालुक्यातील बेट भागात प्रचार दौर्‍यावर असताना शेतकर्‍यांनी रस्त्यात कांदा टाकला म्हणून त्या शेतकर्‍यांवर गुन्हे दाखल झाले होते. त्या शेतकर्‍यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, अशी तंबीही त्या वेळी त्या उमेदवाराने दिली होती. निवडणुकीनंतर ज्यांच्यामुळे उमेदवार चर्चेत आले आणि त्याचा अप्रत्यक्षपणे मतदानात फायदा झाला व खासदार म्हणून निवड झाली, त्यांनीही या शेतकर्‍यांचे फोनसुद्धा उचलले नाहीत. त्यामुळे दोन्हीही बाजूंनी अडचणीत सापडलेले कांदा उत्पादक या वेळी कुणाला साथ देणार? हे येणार्‍या काळात समजेलच. पडलेल्या बाजारभावामुळे शेतकर्‍यांच्या डोळ्यांतील पाणी या उमेदवारांपैकी नक्की कोण पुसणार? यावर उद्याचे राजकीय समीकरण सुटणार आहे. दोन्हीही उमेदवार नव्याने निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून, दोघांनीही गत निवडणुकीतील चिन्ह बदलले आहे. शेतकरी मतदार नक्की कुणाला साथ देईल? याचे चित्र मात्र अद्याप स्पष्ट झालेले दिसत नाही.

हेही वाचा

Back to top button