पुण्यात सोनसाखळी चोरांची चलती; स्ट्रीट क्राईम रोखण्यात पोलिस अपयशी | पुढारी

पुण्यात सोनसाखळी चोरांची चलती; स्ट्रीट क्राईम रोखण्यात पोलिस अपयशी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : सोनसाखळी, मोबाईल हिसकाविणार्‍या चोरट्यांनी अक्षरश: शहरात धुडघूस घातला आहे. काही सेकंदात हे चोरटे महिलांचे दागिने आणि नागरिकांकडील मोबाईल हिसकावून पोबारा करत आहेत. मध्यवर्ती भागासह उपनगरामध्ये जबरी चोरीच्या घटना वाढल्या आहेत. दुचाकीस्वार चोरट्यांच्या लूटमारीचा हा प्रकार एखाद्याच्या जिवावरदेखील बेतू शकतो. त्यामुळे पोलिसांचे या चोरट्यांवर नियंत्रण आहे की नाही, असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. चालू वर्षातील 1 जानेवारी 2024 दरम्यान तब्बल 27 सोनसाखळीच्या घटना, तर 19 मोबाईल हिसकावल्याच्या घटना घडल्या आहेत. या केवळ पोलिस दप्तरी झालेल्या नोंदी असून, तक्रारी न दाखल झालेल्या घटनांची आकडेवारीही लक्षणीय आहे. अनेकदा किरकोळ ऐवज असल्यामुळे नागरिक तक्रार दाखल करण्यात टाळाटाळ करतात.

गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलिस आयुक्तांनी पदभार घेतल्यानंतर गुन्हेगारी टोळीप्रमुख, पंटर लोक, अमली पदार्थ तस्करी, पिस्तुले बाळगणार्‍यांची पोलिस आयुक्तालयाच्या आवारात शाळा भरवली होती. त्यांना सज्जड दमही भरला. मात्र, आता भुरट्या चोरट्यांनी पोलिसांच्या नाकीनऊ आणल्याचे चित्र आहे. एकीकडे रस्तोरस्ती जबरी चोर्‍यांची दहशत कायम असताच पीएमपीएमएल बस प्रवासांतर्गत चोरट्यांकडून प्रवाशांना टार्गेट केले जात आहे.

गर्दीचा फायदा घेत रोकड दागिने लंपास केले जात आहे. एवढेच नाही, तर मदतीच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांच्या हातातील सोन्याच्या बांगड्या कट केल्या जात आहे. चोरींच्या अशा घटना रोखण्यासाठी पोलिसांनी मागील काही वर्षी साध्या वेशात बसमध्ये गस्त घालण्यास सुरुवात केली होती. काही अंशी अशा घटनांना लगाम लागला होता. मात्र, पुन्हा परिस्थिती जैसे थे… झाल्याने चोरट्यांचे चांगलेच फावत आहे. शहरातील स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशन, हडपसर, कात्रज या बसस्थानकांतदेखील चोरटे उदंड झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे आता पोलिसांच्यांच कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह नागरिक उपस्थित करू लागले आहेत.

आकडे काय सांगतात ?

1 जानेवारी ते 24 मार्च 2024

  • सोनसाखळी चोरी : 27
  • मोबाईल चोरी : 19

पोलिसांची गस्त अपुरी

अशा घटना वाढीस लागल्यामुळे तत्कालीन पोलिस आयुक्तांनी लूटमारींच्या ठिकाणांचा शोध घेऊन शस्त्रधारी पोलिसांची पथके गस्तीसाठी तैनात केली होती. तसेच रात्री प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महिला पोलिस अधिकार्‍यांची स्थानिक परिसरात गस्त ठेवली होती. मात्र, सध्या पोलिसांची अशा संवेदनशील ठिकाणी गस्त अपुरी पडत असल्याचे दिसून येते. त्यामुळे लूटमार करणार्‍या चोरट्यांचे ऐतेच फावते.

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

महिलांच्या सुरक्षिततेला आम्ही कुठेही कमी पडणार नसल्याची ग्वाही पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. प्रत्यक्षात मात्र, मागील महिन्याभरात शहरातील विविध भागांत दुचाकीस्वार चोरट्यांनी हैदोस घातला आहे. विशेषतः ज्येष्ठ महिलांसह, पादचारी, कामावरून सुटलेल्या महिलांना चोरटे टारगेट करून लूटमार करत आहेत. चोरटे दुचाकीवर प्रवास करणार्‍या महिलांच्या गळ्यातीलदेखील दागिने हिसकावत आहेत. भरदिवसा दुचाकीस्वार चोरट्यांकडून लूटमार केल्यामुळे महिला तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिस आयुक्तांचे आश्वासन हवेत विरत आहे.

चाकूने वार ते दगडाने मारहाण

जबरी चोरी करणारे चोरटे दागिने हिसकावूनच शांत बसत नाहीत, तर त्यांची मजल आता चाकू, कोयत्याने वार करण्यापासून दगडाने मारण्यापर्यंत गेली आहे. प्रामुख्याने असे प्रकार रात्रीच्या वेळी पुणे स्टेशन, स्वारगेट, शिवाजीनगर, हडपसर परिसरात घडू लागले आहेत. नागरिकाने ऐवज हिसकावताना विरोध केला तर चोरट्यांकडून त्यांच्यावर खुनी हल्लादेखील केला जात असल्याचे प्रकार घडले आहेत. बहुतांश घटनांमध्ये प्रवाशांना चोरट्यांकडून टार्गेट केल्याचे दिसते. तर दुसरीकडे काही रिक्षाचालकांनीदेखील रात्रीचा फायदा घेऊन प्रवाशाला मारहाण करत लुटल्याचे दिसून आले आहे. गर्दुल्ले नशेची भूक भागविण्यासाठी या परिसरात लूटमार करतात.

पोलिसांचा धाक ना चोरट्यांचा शोध

1 जानेवारी 2024 ते 24 जानेवारी 2024 दरम्यान दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी 27 सोनसाखळ्या चोरी करून 19 मोबाईल चोरी करून नेले. त्यामुळे दुचाकीस्वार चोरट्यांना पोलिसांचा धाक राहिला नाही का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेषतः घटना घडल्यानंतरही स्थानिक पोलिस, विविध तपास पथकांना चोरट्यांचा थांगपत्ता लागत नाही. चोरट्यांवर नजर ठेवण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत असतानाही, ते वरचढ ठरत असल्याचे चेनस्नॅचिंगवरून दिसून आले आहे.

हेही वाचा

Back to top button