loksabha elecation : बारामतीकरांपुढे उभे ‘हे’ धर्मसंकट..

loksabha elecation : बारामतीकरांपुढे उभे ‘हे’ धर्मसंकट..

बारामती : पुढारी वृत्तसेवा : बारामती लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. येथे आता विद्यमान खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात जोरदार लढत होणार हे स्पष्ट झाले आहे. परंतु दोघींपैकी कोणाला संधी द्यायची, या धर्मसंकटात बारामतीकर पडले आहेत. प्रत्येक मतदाराने आपल्या सद्सद् विवेक बुद्धीने विचार करून निर्णय घेण्याची वेळ आहे. दोन्ही बाजूकडून प्रचाराच्या एक ते दोन फेर्‍या पूर्ण झाल्या आहेत. लग्नसमारंभ, आठवडे बाजार, घरगुती होणारे छोटे मोठे कार्यक्रम, आणि काही दिवसांपासून सुरू होणार्‍या गावच्या यात्रा- जत्रेत पुढील काही दिवस प्रचाराची राळ उठणार आहे.
मार्च महिना संपून नुकताच एप्रिल महिना सुरू झाला आहे.

सर्वच राजकीय पक्षांपुढे कडक उन्हाचे प्रचंड संकट उभे ठाकले आहे. ऐन उन्हाळ्यात निवडणुकीच्या प्रचाराला बाहेर पडावे लागणार असल्याने सकाळी आणि सायंकाळच्या सत्रातच सर्वाधिक प्रचार करण्यावर उमेदवारांचा व त्यांच्या कार्यकर्त्यांचा भर राहणार आहे. बारामतीच्या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. कोण कोणते सेलिब्रेटी, केंद्र, राज्य पातळीवरील नेते प्रचारात उतरणार यावरही मीडियात चर्चा सुरू आहे. बारामतीच्या जिरायती भागात उन्हाचा सर्वाधिक कडाका आहे. येथील पाणीप्रश्न भीषण झाल्याने उमेदवारांना येथील मतदारांचा रोष स्वीकारावा लागणार आहे. पुरंदर, दौंड, इंदापूर भागाचा बारामतीप्रमाणे विकास व्हावा, अशी ही मागणी मतदार करणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभा मतदारसंघात एकूण तेवीस लाख मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सध्या प्रत्यक्ष गाठी-भेटींसह प्रचाराचे रणशिंग फुंकले गेले आहे. कार्यकर्ते मात्र सोशल मीडियावरती एकमेकांची उणी-धुणी काढण्यात व्यस्त असल्याचे चित्र ग्रामीण भागात पाहायला मिळत आहे. चौका-चौकात, पारावर चर्चा रंगू लागल्या आहेत. अनेकांनी आमचाच उमेदवार जिंकणार असे सांगत पैजा लावल्या आहेत. निवडणुकीत स्थानिक प्रश्न मांडताना कोणी दिसत नाही. बेरोजगारी, शेतीच्या पाण्याचा प्रश्न, वाढती महागाई यावर मतदारांचा रोष उमेदवारांना पत्कारावा लागणार आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news