उष्णतेपासून बचावासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय : आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला | पुढारी

उष्णतेपासून बचावासाठी करा 'हे' घरगुती उपाय : आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला

पुणे : पुढारी वृत्तसेवा : एप्रिल महिना सुरू होण्याआधीच उन्हाळा ‘मी’ म्हणू लागला आहे. वाढलेले तापमान, घामामुळे शरीरातील पाण्याचे कमी होणारे प्रमाण, अतिसारामुळे आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे शरीराला गारवा मिळण्यासाठी घरगुती उपाय करावेत, असा सल्ला आयुर्वेदतज्ज्ञांनी दिला आहे. आयुर्वेदानुसार प्रत्येक ऋतूचा दोषाशी संबंध असतो. त्यानुसार आहाराचे नियोजन करणे आरोग्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरते. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पचायला हलके पदार्थ खाण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

याशिवाय रात्रीच्या वेळी सब्जाचे बी भिजवून दुसर्‍या दिवशी पाण्यात घालून पिणे, रात्री झोपताना तळपायांना तेलाने मालीश करणे, असे उपाय केल्याने उन्हाळ्यातील त्रासापासून बचाव होऊ शकतो. उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडणे, डोळ्यांची आग होणे, थकवा येणे, असे त्रास होण्याची जास्त शक्यता असते. अशा वेळी दिवसभरात भरपूर पाणी पिणे हा अत्यंत सोपा आणि गुणकारी उपाय आहे. डोळ्यांवर दुधात भिजवून कापडाची घडी ठेवल्यास किंवा काकडीचे काप ठेवल्यास थंडावा मिळतो.

काय उपाय करावेत?

  • उन्हाळ्यात भरपूर पाणी पिणे आवश्यक असते. उन्हातून आल्यावर लगेच फ्रिजमधील थंडगार पाणी पिऊ नये. सामान्य तापमानाचे पाणी पिणे केव्हाही चांगले.
  • उन्हाळ्यात सुती, हलक्या रंगाचे आणि सैलसर कपडे घालावेत.
  •  उन्हाळ्यात त्वचा कोरडी पडत असल्याने रसायनयुक्त क्रीम वापरण्याऐवजी घरगुती फेस पॅकचा वापर करावा.
  • आहारात काकडी, गाजर, बीट यांसह कलिंगड, संत्री अशा रसाळ फळांचा समावेश करावा.
  • दररोज हलक्या स्वरूपाचा व्यायाम करावा.

उन्हामुळे डोके दुखत असल्यास कपाळ आणि भुवयांमध्ये तूप लावून मालीश करावी. धने, जिरे, बडीशेप आणि ओव्याचे पाणी प्यायल्याने शरीराला थंडावा मिळतो. घराबाहेर पडताना आपल्याजवळ खडीसाखर, काळे मनुके, बत्तासे ठेवावेत आणि अधूनमधून खावेत. उन्हाळी लागणे, घुळणा फुटणे असा त्रास होत असल्यास कांद्याचा वास घ्यावा तसेच दूर्वांचा रस नाकात घालावा.

– डॉ. रोहित बापट, आयुर्वेदतज्ज्ञ

हेही वाचा

Back to top button