शेतकर्‍यांना दिलासा ! जिल्हा बँकेच्या पीककर्ज मर्यादेत पाच टक्के वाढ | पुढारी

शेतकर्‍यांना दिलासा ! जिल्हा बँकेच्या पीककर्ज मर्यादेत पाच टक्के वाढ

किशोर बरकाले

पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून (पीडीसीसी) प्राथमिक शेती सहकारी संस्थांमार्फत शेतकर्‍यांना पीककर्जपुरवठा केला जातो. त्यासाठी हंगाम 2024-25 च्या खरीप हंगामाकरिता अल्पमुदत पीककर्जाच्या कमाल कर्ज मर्यादेत प्रतिहेक्टरी सरासरी पाच ते सहा टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यंदाच्या हंगामात पीककर्जासाठी तीन हजार कोटी रुपयांचे पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा. डॉ. दिगंबर दुर्गाडे यांनी दिली. जिल्हा बँकेला गतवर्ष 2023- 24 मध्ये खरीप व रब्बी हंगामात मिळून 2 हजार 520 कोटी रुपयांइतके पीककर्जवाटपाचे उद्दिष्ट जिल्हास्तरीय समितीने दिले होते. त्यापेक्षा अधिक म्हणजे 2 हजार 774 कोटींचा (उद्दिष्टाच्या 110 टक्के) कर्जपुरवठा सुमारे 3 लाख 9 हजार 64 शेतकर्‍यांना करण्यास जिल्हा बँकेला यश आले आहे.

जिल्हा बँकेचा पाठपुरावा आणि सहकार्यामुळे विकास सोसायट्यांमार्फत अधिकाधिक पीककर्जपुरवठा पूर्ण करण्यात बँकेला नेहमीच यश आले आहे. बँकेला दिलेले उद्दिष्ट नेहमीच साध्य होऊन अधिकाधिक पीककर्जवाटप पूर्ण केले जाते. चालूवर्षी जिल्हास्तरीय समितीकडून वाढीव उद्दिष्ट येण्याची अपेक्षा असून, दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक पीककर्जवाटप करण्यास आर्थिक निधी कमी पडू दिला जाणार नाही. तरी शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त पीककर्ज घेऊन शेती हंगाम यशस्वी करण्याचे आवाहन प्रा. दुर्गाडे यांनी केले आहे. हंगाम 2024-25 साठी संमत करण्यात आलेले पीककर्जदर प्रतिहेक्टरी पुढीलप्रमाणे.

(कंसात वाढ दर्शविली आहे.) ः ऊस – आडसाली 1,65,000 (5 हजार), पूर्व हंगामी 1,55,000 (5 हजार), सुरू 1,55,000 (5 हजार). द्राक्षे ः सर्वसाधारण- वाईनरी 3,70,000, निर्यातदार 3,70,000 (प्रत्येकी 20 हजार). केळी ः केळी 1,50,000 (15 हजार), टिश्युकल्चर केळी 1,80,000 (15 हजार), सर्वसाधारण केळी- खोडवा 1,20,000 (20 हजार). स्वीट कॉर्न मका 40,000 (4 हजार). पानमळा 80,000 (25 हजार), बटाटा खरीप 1,05,000 (5 हजार), सुधारित बटाटा वेफर्स 1,05,000 (5 हजार), कपाशी जिरायत संकरित 65,000 (13 हजार), कपाशी बागायत संकरित 76,000 (7 हजार), ज्वारी खरीप : संकरित/ सुधारित/ जिरायत 44,000 (14 हजार), बाजरी : खरीप- रब्बी 43,000 (13 हजार), जिरायत 35,000 (10 हजार), भात : सुधारित- आंबेमोहोर- इंद्रायणी- पवना 75,000 (10 हजार), संकरित भात 75,000 (10 हजार). मूग 27,000 (7 हजार), मिरची : खरीप- रब्बी 1,00,000 (25 हजार), लसूण 60,000 (20 हजार), हळद व आले प्रत्येकी 1,36,000 (31 हजार), कांदा खरीप 1,05,000 (5 हजार). तर फळबागांमध्ये कागदी लिंबू 80,000 (10 हजार), पेरू 1,05,000 (5 हजार), पपई 85,000 (8 हजार), डाळिंब सुधारित जात 2,00,000 (25 हजार), सीताफळ 80,000 (20 हजार). दरम्यान, तेलबियांमध्ये तीळ, सूर्यफूल, सोयाबीन, जवसाची पीक कर्ज मर्यादेतही किंचित वाढ करण्यात आली आहे. तसेच, शेतीपूरक व्यवसायामध्ये डेअरी, पोल्टी व फिशरीमध्ये खेळत्या भांडवल खर्चाचे दरही वाढविण्यात आले आहेत.

पुणे जिल्ह्यात सर्वाधिक  पीककर्जवाटप करण्यात पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा अग्रक्रम कायम आहे. जिल्हा तांत्रिक समितीने शेती हंगाम 2024-25 साठी पीककर्जाची मर्यादा वाढवून दिलेली आहे. त्यावर राज्य तांत्रिक समितीने शिक्कामोर्तब केले आहे. बहुतांशी पिकांच्या पीककर्ज मर्यादेत सरासरी पाच ते सहा टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झालेली आहे.

– अनिरुद्ध देसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक.

हेही वाचा

Back to top button