Crime News : अनुष्काच्या मृत्यूला कारणीभूत पती मोकाटच | पुढारी

Crime News : अनुष्काच्या मृत्यूला कारणीभूत पती मोकाटच

मंचर : पुढारी वृत्तसेवा : अनुष्का केतन गावडे हिच्या संशयास्पद मृत्यूला कारणीभूत ठरलेला तिचा पती केतन गावडे हा गेल्या दोन महिन्यांपासून अद्यापही मोकाटपणे फिरत आहे. मंचर पोलिसांनी त्याला तातडीने जेरबंद करावे, अशी मागणी अनुष्का हिचे वडील अतुल आनंद बांगर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांना पाठविलेल्या निवेदनात बांगर यांनी म्हटले आहे की, अनुष्का हिचा विवाह 1 एप्रिल 2021 रोजी निरगुडसर, बेलसरवाडी येथील केतन गुलाब गावडे याच्याशी मंचर (ता. आंबेगाव) येथे झाला. लग्नात मानपान नीट केला नाही, हुंडा दिला नाही, चारचाकी गाडी घेण्यासाठी माहेरावरून पैसे आणावेत या कारणावरून अनुष्काचा छळ केला जात होता.

25 जानेवारी 2024 रोजी रात्री अनुष्काची तब्येत बिघडल्याचे समजल्यानंतर आम्ही मंचर उपजिल्हा रुग्णालयात गेलो होते. त्या वेळी अनुष्काच्या नाका-तोंडातून रक्त व फेस आला होता. तिचे शरीर काळेनिळे पडून उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूबाबत सासरच्या लोकांनी संशयास्पद उत्तरे दिली होती. अनुष्काची आई स्वाती बांगर हिने दिलेल्या फिर्यादीनुसार पती केतन गुलाब गावडे, सासरे गुलाब सखाराम गावडे, सासू कल्पना गुलाब गावडे, दीर डॉ. कांचन गुलाब गावडे व जाऊ डॉ. शुभांगी कांचन गावडे यांच्यावर मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर काही दिवसांनी यातील चौघांना खेड न्यायालयाकडून अंतरिम जामीन मिळाला, तर केतन गावडे दोन महिने फरार आहे. तसेच अनुष्काच्या मृत्य अगोदर 23 दिवसांपूर्वी गावडे कुटुंबीयांनी 81 लाख रुपयांचा विमा काढला होता. या सर्व गोष्टी संशयास्पद आहेत. याबाबत मंचर पोलिसांनी या घटनेची सखोल चौकशी करावी. मुख्य संशयित आरोपी केतन गावडे याला त्वरित अटक करावी, अशी मागणी बांगर यांनी निवेदनात केली आहे.

हेही वाचा

Back to top button