जाती-धर्मा पलीकडची गोष्ट : मुस्लिम अवलिया करतोय देवळांची साफसफाई | पुढारी

जाती-धर्मा पलीकडची गोष्ट : मुस्लिम अवलिया करतोय देवळांची साफसफाई

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंड तालुक्याच्या बोरीपार्धी गावातील दस्तगीर वजीर सय्यद हा अवलिया गावच्या देवळांची झाडलोट करतो, दिवा वात लावून सणवाराला दैवतांच्या पालखीला न चुकता हजर असतो. दस्तगीर यांचे वडील वजीर हे हयात असतानाच दस्तगरी यांनी ही जबाबदारी शिरावर घेतली आणि मोठ्या इमानेइतबारे ते ही जबाबदारी पार पाडत असून ते आता सेवेकरी झाले आहेत. दस्तगीर सय्यद यांच्या राहत्या घरापासनू काही अंतरावर मस्जिद तसेच तेवढ्याच अंतरावर गावचे मारुती मंदिर, लक्ष्मीआई मंदिर आणि विठ्ठल मंदिर आहेत.

न चुकता सकाळ-संध्याकाळ अवलिया दस्तगीर या मंदिरांची झाडलोट करतो, सायंकाळी तीनही मंदिरांमध्ये तेल वात करतो. हा त्याचा नित्यक्रम वडीत हयात असतानापासूनच सुरू झाला होता. आता या घटनेला बोरीपार्धीत अर्ध्या शतकांपेक्षा अधिक काळ झाला आहे.
दस्तगीर यांचे वडील वजीर यांची हयात गावच्या देवदैवतांच्या पूजेतच गेलेली आहे आणि दस्तगीर देखील हीच सेवा मनोभावे करीत आहे. आजपर्यंत गावकर्‍यांची त्याच्या सेवेबाबत कोणतीच तक्रार नाही.

वाखारीत पीरबाबांचे सर्वधर्मीयांकडून पूजन

दौंड तालुक्यातील अशी घटना पहिलीच नसून तालुक्यामध्ये वाखारी हे गाव पीर बाबा मोहम्मद यांच्या नावाने ग्रामदैवत म्हणून प्रसिद्ध आहे. संपूर्ण गाव या ठिकाणी पीर बाबा दैवताची यात्रा करते. त्यांचे पूजन करते. बोरीपार्धी आणि वाखारी या गावात असलेला बंधुभाव हा सर्वश्रेष्ठ असल्याने इथून पुढच्या काळामध्ये सर्वांनी एक राहावे, अशी अपेक्षा व्यक्त केली तर ती चुकीचे ठरू नये.

हेही वाचा

Back to top button