रेल्वेच्या पुणे विभागाची ‘हद्दवाढ’; रेल्वे संचलनासोबत प्रवाशांना ठरणार फायदेशीर | पुढारी

रेल्वेच्या पुणे विभागाची 'हद्दवाढ'; रेल्वे संचलनासोबत प्रवाशांना ठरणार फायदेशीर

प्रसाद जगताप

पुणे : बहुप्रतिक्षित सोलापूर विभागातील दौंड ते येवला 220 कि.मी. आणि अहमदनगर ते अमळनेर 100 कि.मी. असा एकूण 320 किलोमीटरचा भाग रेल्वेच्या पुणे विभागात येत्या 1 तारखेपासून समाविष्ट करण्यात येणार आहे. यामुळे रेल्वेच्या पुणे विभागातील अधिकार्‍यांवरील कामाचा ताण वाढणार असला, तरी रेल्वे गाड्या संचलनाच्या दृष्टीने आणि प्रवाशांच्या सोयीसाठी फायद्याचे ठरणार आहे.

रेल्वे बोर्डाने यासंदर्भातील आदेश नुकतेच जारी करत ही घोषणा केली. त्यानुसार रेल्वेचा पुणे विभाग आणि सोलापूर विभागाकडून कार्यवाही सुरू आहे आणि त्यादृष्टीने कामकाज करण्यासाठी नियोजन सुरू केले आहे. सोलापूर विभागातील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा असलेला हा भाग पुणे विभागात समाविष्ट होणार आहे, त्यादृष्टीने पुणे विभागाचे काय नियोजन आहे, हे जाणून घेण्यासाठी दै.’पुढारी’च्या प्रतिनिधीने गुरुवारी (दि.28) पुणे विभागातील रेल्वे अधिकार्‍यांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नवीन भाग जोडला गेल्यामुळे वरिष्ठ पातळीवरील कामाचा ताण थोडासा वाढणार असल्याचे सांगितले. मात्र, हे रेल्वे गाड्यांच्या संचलनासाठी आणि प्रवाशांना आपत्कालीन व अन्य सोयी पुरवण्याच्या दृष्टीने सोयीस्कर झाल्याचेही त्यांनी या वेळी बोलताना सांगितले.

कामाचा ताण वाढणार; मात्र प्रवाशांची सोय

सोलापूर विभागातील दौंड ते येवला आणि अहमदनगर ते अमळनेर हा मोठा भाग पुणे विभागात येत्या 1 तारखेपासून समाविष्ठ होणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या निर्णयामुळे दौंडला उपनगर दर्जा मिळण्याची शक्यता असून, पुणे- लोणावळाप्रमाणे पुणे- दौंड लोकल गाड्या (ईलेक्ट्रिक) देखील आगामी काळात धावण्याची शक्यता आहे. तसेच, पूर्वी या भागात एखादी दुर्घटना घडली तर आपत्कालीन मदत पोहोचण्यासाठी उशीर लागत होता. मात्र, पुणे विभागातून आता तत्काळ मदत पोहोचवता येणार आहे.

पेट्रोलियम लोडिंगची एक लाईन वाढली

रेल्वे मालगाडीतून पेट्रोलियम पदार्थांची वाहतूक झाल्यास, त्याद्वारे रेल्वेच्या उत्पन्नाला चांगलाच हातभार लागत आहे. त्यातच नवीन विभाग जोडला जाणार असल्यामुळे रेल्वेच्या पुणे विभागात पेट्रोलियम पदार्थांची आणखी एक लाईन जोडली जाणार आहे. पूर्वी पुणे विभागातून लोणी, आळंदी, मिरज आणि बिलवडी या भागातून पेट्रोलियम पदार्थांची मालवाहतूक होत होती. त्यात आता नव्या विभागातील अकोळनेरमध्ये असलेली पेट्रोलियम पदार्थांची आणखी एक लाईन जोडली जाणार आहे.

पुणे विभागामध्ये 320 किलोमीटरचा भाग वाढला आहे. त्यामुळे रेल्वेचा पुणे विभाग आता 871 किलोमीटरचा असेल. रेल्वे गाड्या संचलन (ऑपरेशन) आणि प्रवाशांच्या सोयीसाठी हे फायद्याचे ठरणार आहे.

– डॉ. मिलिंद हिरवे, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, रेल्वे, पुणे विभाग

हेही वाचा

Back to top button