Breaking : क्लोरल हायड्रेटचा कारखाना उध्वस्त; पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये कारवाई | पुढारी

Breaking : क्लोरल हायड्रेटचा कारखाना उध्वस्त; पुणे पोलिसांची संगमनेरमध्ये कारवाई

पुणे : मेफेड्रोन ड्रगतस्करीचे आंतराष्ट्रीय रॅकेट उद्धवस्त केल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखेने आणखी एक मोठी कारवाई केली आहे. पुणे शहरात केमिकल ताड़ी तयार करण्यासाठी लागणारे केमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करत अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील एक कारखाना उद्धवस्त केला आहे. तेथून तब्बल दोन हजार तीनशे किलो(2300 KG) क्लोरल हायड्रेट पावडर (केमिकल ) जप्त करण्यात आली आहे . त्याची किंमत 60 लाख रुपयांच्या घरात आहे. तसेच तेथून केमिकल तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. सर्वात गंभीर म्हणजे सातवी पास व्यक्ती हा कारखाना चालवित होता.

शहरात ताडीच्या संदर्भात कारवाई केल्यानंतर त्याचा तपास करत असताना केमिकलपासून ताडी तयार करण्यासाठी लागणारे क्लोरल हायड्रेट केमिकल संगमनेर मधील वेल्हाळे गावातून पुरवठा होत असल्याचे समोर आले. त्यानुसार गुन्हेशाखेने थेट वेल्हाळे गावात धडक देवून छापा टाकला. एक किलो क्लोरल हायड्रेट पावडरपासून तब्बल दोनशे लिटर ताडी तयार केली जात होती.

राज्यात पुणे पोलिसांनी केलेली अद्यापर्यंतची ही सर्वांत मोठी तसेच केमिकल (CH) कारखाना उद्धवस्त केल्याची पहिलीच कारवाई असल्याचे समजते. तीन दिवस विशेष मोहिम राबवून गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. क्लोरल हायड्रेट केमिकलपासून तयार केलेली ताडी पिल्याने आरोग्याच्या अती – गंभीर समस्या निर्माण होतात. प्रसंगी व्यक्तीचा मृत्यू देखील होवू शकतो.

गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला या रॅकेटची माहिती मिळाली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार , सह पोलिस आयुक्त प्रवीण पवार, अपर पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस आयुक्त सतीश गोवेकर, सुनिल तांबे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

हेही वाचा

Back to top button