पुणे : आळेफाटा येथील इमारतीमध्ये घुसला बिबट्या; दुचाकीस्वार जखमी | पुढारी

पुणे : आळेफाटा येथील इमारतीमध्ये घुसला बिबट्या; दुचाकीस्वार जखमी

आळेफाटा; पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्ग ओलांडताना बिबट्याने दुचाकीला धडक दिली. यामध्ये दुचाकीस्वार जखमी झाला. त्यानंतर हा बिबट्या थेट लगतच्या इमारतीमध्ये घुसला. आळेफाटा (ता. जुन्नर) चौकाजवळ मंगळवारी (दि. २६) रात्री ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. जवळपास सव्वा तासानंतर हा बिबट्या या इमारतीतून बाहेर निघून लगतच्या शेतात पळून गेला. आळेफाटा चौकापासून अवघ्या काही अंतरावर रात्री ९ वाजता हा बिबट्या पुणे-नाशिक महामार्ग ओलांडत होता. या वेळी त्याची एका दुचाकीला धडक बसली. यामध्ये दुचाकीस्वार रामजी वर्मा हा जखमी झाला. धडकेनंतर बिबट्या थेट बाजूच्या पांडुरंग नरवडे यांच्या पांडुरंग कृपा या इमारतीमध्ये घुसला. त्यामुळे रहिवाशांची मोठी घाबरगुंडी उडाली. त्यांनी दरवाजे लावून घेतले. त्यानंतर हा बिबट्या जिन्याने थेट टेरेसवर गेला.

बिबट्या इमारतीमध्ये घुसल्याची माहिती मिळताच नागरिकांनी एकच गर्दी केली. वन विभागाचे वनरक्षक कैलास भालेराव यांच्यासह रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. दुसऱ्या बाजूने इमारतीवर चढून त्यांनी बिबट्यास खाली हुसकावले. मात्र बिबट्याने खाली येत असताना पत्र्याच्या शेडवर उडी मारून आश्रय घेतला. जवळपास सव्वा तासानंतर बिबट्या इमारतीतून बाहेर आला व लगतच्या शेतात धूम ठोकली, तेव्हा कुठे रहिवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

Back to top button