कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : रक्तदानाबाबत अजूनही गैरसमज आहेत. ते दूर झाले पाहिजेत. रक्तदानाबाबत साक्षरता गरजेची असल्याचे दैनिक 'पुढारी'चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी सांगितले. राजर्षी शाहू ब्लड केंद्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाला डॉ. जाधव यांच्या उपस्थितीत रविवारी आयोजित कार्यक्रमात प्रारंभ झाला.
देशपातळीवर रक्तपेढीसाठी दिले जाणारे 'एन.ए.बी.एच.' मानांकनाचे प्रमाणपत्र डॉ. जाधव यांच्या हस्ते चेअरमन महेंद्र परमार, सचिव राजेंद्र दोशी, खजानीस राजीव पारीख यांनी स्वीकारले. या कार्यक्रमात डॉ. जाधव यांच्या हस्ते 'क्रायोफ्यूज' आणि 'नॅट' टेस्टिंग मशिनचेही उद्घाटन करण्यात आले. यावेळी केक कापण्यात आला. यावेळी कोल्हापूर मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. किरण दोशी प्रमुख उपस्थित होते.
डॉ. जाधव म्हणाले, देशात दरवर्षी 41 दशलक्ष युनिट रक्ताचा तुटवडा आहे. मागणी आणि तुटवडा याचे प्रमाण व्यस्त आहे. देशाच्या लोकसंख्येच्या तुलनेत किमान 1 टक्के लोकांनी रक्तदान करणे गरजेचे आहे. मात्र, हे प्रमाण 0.6 टक्के इतके आहे. देशात तर वेळेत रक्त व त्यातील आवश्यक घटक न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचे प्रमाण 15 टक्के इतके आहे. यामुळे रक्तदानाबाबत नागरिकांना सज्ञान केले पाहिजे.
डॉ. जाधव म्हणाले, शरीरातील प्रत्येक अवयवाला रक्ताची गरज आहे. प्रत्येक आजाराचा रक्त हाच इंडिकेटर आहे. यामुळे रक्त हा शरीरातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विस्फोट होत आहे. त्यातून वैद्यकीय विज्ञान तर प्रचंड पुढे गेले आहे. आता 'एआय' तंत्रज्ञान तर अचंबित करणारे आहे. मात्र, इतके सगळे होऊनही अद्याप मानवाला कृत्रिम रक्त तयार करता आलेले नाही. रक्तासाठी मानवाला मानवावरच अवलंबून राहावे लागत आहे. यामुळे रक्तदानाविषयी जनजागृती वाढलीच पाहिजे.
रोटरी समाज सेवा केंद्राची ही इमारत आता आरोग्य मंदिर झाले आहे. यामध्ये अनेकांचे योगदान आहे, असे सांगत डॉ. जाधव म्हणाले, रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, हे पुण्याचेच काम आहे. समाजाचे आपल्यावरही ऋण असतात. त्यातून उतराई होण्यासाठी समाजाचे देणे लागतो. म्हणून पुण्याईचा बॅलन्स अशा सामाजिक कार्यातून वाढवावा, असे आवाहनही त्यांनी केले. दातृत्व आणि कर्तृत्वाची कोल्हापूरला मोठी परंपरा आहे. रक्तदानाबाबत विविध उपक्रमांबाबत 'पुढारी' माध्यम समूहाच्या वतीने सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
केंद्राचे चेअरमन परमार यांनी प्रास्ताविकात संस्थेची जडणघडण कशी झाली याची माहिती दिली. 'केएमए'चे अध्यक्ष डॉ. दोशी यांनी मनोगत व्यक्त केले. राजेंद्र दोशी यांनी आभार मानले. इशा वायकूळ यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमात सरोज ग्रुपचे दीपक जाधव, भरत जाधव, शेतकरी संघाचे अध्यक्ष प्रवीणसिंह पाटील, राजसिंह शेळके, रोटरी समाज सेवा केंद्राचे अध्यक्ष सुभाष मालू, अमोल माटे, रेडक्रॉस सोसायटीचे सतीशराज जगदाळे, व्ही. बी. पाटील, सिद्धार्थ पाटणकर, प्रदीप पासमल, शंकरराव पाटील, प्लेटलेट डोनर विश्वजित काशीद, वसंत चव्हाण, डॉ. अक्षता पवार, डॉ. आफ्रिन नाईकवाडी, केतकी देसाई आदींसह विविध रुग्णालये, रक्तदान शिबिर आयोजित करणार्या संस्था, संघटना आदींचा यावेळी गौरव करण्यात आला. यावेळी नितीन चौगले, अविनाश रास्ते, प्रदीप कारंडे, नारायण पटेल, नरेंद्र बन्सल, संजीव चिपळूणकर, समीर वायकूळ, राजेंद्र देशिंगे, राजन दोशी, सुरेंद्र जैन, अजिंक्य कदम आदींसह विविध रोटरी क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.