पुणेकरांचा हवाई प्रवास सुसाट! दुबई, सिंगापूरचा चकरा वाढल्या..

पुणेकरांचा हवाई प्रवास सुसाट! दुबई, सिंगापूरचा चकरा वाढल्या..

पुणे :पुढारी वृत्तसेवा : पुणे विमानतळावरून होत असलेल्या दुबई (शारजा) आणि सिंगापूर या आंतरराष्ट्रीय विमानोड्डाणांना पुणेकर प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, यंदाच्या आर्थिक वर्षात (2023-24) 1 लाख 69 हजार 329 प्रवाशांनी पुण्यातून थेट दुबई, सिंगापूरसारख्या देशांमध्ये प्रवास केला आहे. तसेच, या प्रवाशांकरिता पुणे विमानतळावरून तब्बल 1 हजार 554 विमानोड्डाणे झाल्याची नोंद करण्यात आली आहे.

लोहगाव येथील पुणे विमानतळावरून प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे येथील जुन्या टर्मिनलवर प्रवाशांचा भार वाढला आहे. येथून आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत मिळून अशी दिवसाला 180 ते 190 च्या घरात विमानोड्डाणे होत असतात. त्याद्वारे दिवसाला 25 ते 30 हजार प्रवाशांचा प्रवास होतो. मात्र, ही वाढती संख्या पाहता आता पुणे विमानतळ प्रवाशांसाठी अपुरे पडत असून, परिणामी ते गैरसोयीचे बनले आहे. परंतु, हे लक्षात घेत भारतीय विमानतळ प्राधिकरणाने येथील जुन्या टर्मिनलला लागूनच येथे भव्य असे नवीन विमानतळ टर्मिनल उभारले आहे. विमानतळ आणि स्थानिक प्रशासन येथील धावपट्टी वाढविण्यासाठी देखील प्रयत्न करीत आहेत.

सुट्यांच्या काळात 'हवाहवाई'

अलीकडील काही वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू झाल्यानंतर पुण्यातून थेट परदेशात प्रवासास पुणेकरांकडून चांगला प्रतिसाद दिला जात आहे. सुट्यांच्या कालावधीमध्ये म्हणजेच उन्हाळी सुट्यांच्या मे महिन्यात सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केल्याचे समोर आले आहे.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला प्रतिसाद

पुण्यातून थेट परदेशात प्रवास सुट्यांच्या काळासह जानेवारी 2024 या नवीन वर्षाच्या पहिल्या महिन्यात देखील पुणेकरांनी सर्वाधिक केल्याचे समोर आले आहे. जानेवारी 2024 मध्ये पुणे विमानतळावरून वर्षातील सर्वाधिक 136 विमानोड्डाणे झाली. त्या वेळी 15 हजार 578 प्रवाशांनी प्रवास केल्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news