दौंडचे सा. बां. उपविभाग भ्रष्टाचाराचे आगार? करोडो रुपये खर्च झालेले रस्तेच गायब | पुढारी

दौंडचे सा. बां. उपविभाग भ्रष्टाचाराचे आगार? करोडो रुपये खर्च झालेले रस्तेच गायब

केडगाव : पुढारी वृत्तसेवा : दौंडचे सार्वजनिक बांधकाम उपविभाग भ्रष्ट कारभाराचे आगार असून, या ठिकाणी शासनाच्या निधीची विकासकामांच्या नावाखाली लूट केली जाते का? अशा स्वरूपाचा प्रश्न या विभागातील झालेल्या कामांचा तपशील पाहता निर्माण होत आहे. दौंड तालुक्यात या विभागाने काही रस्ते केलेच नाहीत, काही दुरुस्तीच्या नावाखाली दाखविले आहेत, काहींचा शोध लागणेच अवघड आहे, अशी परिस्थिती आहे. या सर्व प्रकरणात कोणीच काही सांगू शकणार नसू,न या विभागाचे अधिकारी मात्र खर्ची झालेल्या रकमा आणि कामे, याबद्दल माहिती देऊ शकतात. परंतु, ते काहीच सांगण्यास तयार नाहीत. काही दुखावलेले ठेकेदार याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर देत आहेत.

काही रस्त्यांच्या खर्चाचा आकडा आणि रस्ता पाहता आश्चर्यकारक घटना म्हणून त्याकडे पाहण्याची वेळ येत आहे. याचा दाखला द्यायचा असेल तर पाटस-बारामती रस्त्यावर कडे वासुंदे परिसरात या विभागाने दहा कोटी रुपये खर्च करून एक रस्ता केल्याची माहिती पत्रात नमूद केले आहे. प्रत्यक्षात हा रस्ता अस्तित्वात नाही आणि या रस्त्यातील आठ कोटी रुपये यापूर्वीच खर्च झाले असून, दोन कोटी रुपये खर्चासाठी येथील ग्रामस्थांचा पत्रव्यवहार करून घ्यावा, अशा स्वरूपाची सूचना या विभागाच्या अधिकार्‍यांनी संबंधित ठेकेदाराला दिलेले आहेत, अशी माहिती वासुंदे ग्रामस्थांकडून मिळालेली आहे.

हा रस्ता कुठे आहे? अशा स्वरूपाची विचारणा या विभागाचे उपअभियंता ह. ना. माळशिकारे यांच्याकडे केली असता सदर रस्ता पालखीमार्गाच्या खाली गेला आहे. पालखीमार्गाचे काम सुरू होण्याअगोदर हा रस्ता करण्यात आला होता, अशा स्वरूपाची माहिती ते देत आहेत. मात्र, या रस्त्यावर अमित कन्स्ट्रक्शन खोपडी यांनी वासुंदे रस्ता रामा क्रमांक 123 ची साडेबारा किलोमीटरची सुधारणा यातून केलेली आहे आणि हा रस्ता 2020 मध्ये केला आहे. याच काळात पालखीमार्गाचे काम सुरू झालेले होते. केंद्रीय निधीतून हा रस्ता चारपदरी केला आहे.

करोडो रुपयांच्या या रस्त्याला सध्या टोल भरावा लागतो आहे. याचे काम सुरू होण्याअगोदर साधरण दोन-तीन वर्षे कामाबाबत हालचाली चालू असतात, याचा पुरेपूर फायदा या विभागाने घेऊन दहा कोटींचा रस्ता याअंतर्गत करून हे पैसे गायब केलेत, असे चित्र यातून स्पष्ट होत आहे. न्हावरा-चौफुला रस्त्यावर अशा स्वरूपाचे एक प्रकरण घडलेले आहे. सध्या 168 कोटींचा रस्ता तिथे सुरू असून, रस्त्याच्या खाली याच विभागाने साधारण दहा ते बारा कोटी रुपये दुरुस्तीच्या नावाखाली गाडले आहेत. अशा प्रकारची अनेक कामे पाहता हा विभाग भ्रष्ट कारभाराचा आगार असून, शासनाच्या पैशाची अक्कलहुशारीने लूट करण्याचे प्रकार होत तर नाहीत ना? असा प्रश्न निर्माण होत आहे.

हेही वाचा

Back to top button