

ओतूर : गत वर्षभरातील राजकीय उलथापालथ पहाता अचानक झालेले मोठे बदल जनतेला मान्य होतीलच याची कोणतीही तमा न बाळगता पक्ष बदलाची शर्यत नेत्यांमध्ये बघायला मिळाली, त्याचा विपरित परिणाम होऊन मतदारदेखील सैरभैर झाल्याचे चित्र सध्या दिसत आहे. कोण कुणाचा? हे कळणे तितकेसे सोपे नसल्याने ग्रामीण भागात मतेरी भी चूप मेरी भी चूपफ ची भूमिका मतदार बजावत असल्याची बाब पुढे आली आहे. कपडे बदलायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळात नेते पक्ष बदलत असल्याने निष्ठेचे तीन तेरा अन् नऊ बारा वाजले आहेत.
पक्ष, नेता, निष्ठा ही संकल्पना आता कोसो दूर गेल्याचे चित्र सर्वत्र आहे. जुन्या काळात असलेली निष्ठा अन् आजची निष्ठा यात बरेच अंतर पडले असून आजची निष्ठा बाजारू असल्याचे बोलले जात आहे. नवीन उमेदवार व चेहरा या लोकसभेच्या निवडणुकीत कुठे नजरेत येत नसल्याने स्वार्थाचे देखील दर्शन होऊ लागले आहे. तेच ते उमेदवार आणि पक्ष बदल याला मतदार कंटाळले आहेत. 1970 च्या दशकात शब्दाला मोठी किंमत होती. त्याकाळी दिलेला शब्द पाळला जात असे, आज ती परिस्थिती दिसत नाही. 1970 ला जुन्नर विधानसभेत दिवंगत श्रीकृष्ण रामजी तांबे हे आमदार म्हणून मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते ते केवळ मतदारांच्या शाब्दिक विश्वासावरच अन् त्यांनी देखील आमदार झाल्यावर मतदारांना दिलेला शब्द पाळला आणि त्यांच्या पाठपुराव्याने अणे- माळशेज घाटाची निर्मिती होऊन महाराष्ट्राची राजधानी मुंबई या भागाला जवळ झाली.
जुन्नर तालुक्यात पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे आण्णासाहेब वाघिरे महाविद्यालयाची ओतूर येथे निर्मिती करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक गंगा प्रवाहित केली. संपूर्ण तालुक्यातील विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी त्या वेळी ओतूर येथे येत असत. कालांतराने 26 सप्टेंबर 1973 रोजी त्यांचे निधन झाले, मात्र त्यांनी आमदारकीसाठी मिळालेल्या तीन वर्षांत दिलेले सर्व शब्द पाळून तालुक्याचा विकास केला, निष्ठा ती कशी असावी याचा उत्तम आदर्श व इतिहास अतिशय अल्पकाळात त्यांनी पुढील अनेक पिढ्यांसमोर उभा केला. त्यांचे फोटो आजही मोठ्या निष्ठेने आणि श्रध्देने ओतूर पंचक्रोशी व तालुक्यातील प्रत्येक घराघरांत लागलेले दिसतात. त्यानंतर त्यांच्या पत्नी दिवंगत लता नानी तांबे यांनी उर्वरित दोन वर्षे आमदारकीची धुरा समर्थपणे पेलली, ती श्रेष्ठींनी त्यांना दिलेल्या शब्दामुळेच अशी निष्ठा आणि शब्द हल्ली संपुष्टात आलेले आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपले प्रतिस्पर्धी उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांना नुकत्याच चौथ्या पक्ष बदलाच्या शुभेच्छा दिल्या, मात्र आढळराव हे सलग 15 वर्षे शिवसेनेत होते. आज ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातून घड्याळ हातात घेऊन उभे आहेत तर अमोल कोल्हेंचा राजकीय प्रवासही काही कमी नाही. 2009 मध्ये मनसे, 2014 ला शिवसेना, 2019 ला राष्ट्रवादी आणि आता 2024 ला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट असा दर 5 वर्षाला पक्ष बदलत ते आज तुतारी हातात घेऊन मतदारांसमोर ठाकले आहेत. उमेदवारांनी मतदारांना शब्द जरूर द्या, पण त्याचे तंतोतंत पालनही करा, असे आजच्या बुजुर्ग मतदारांचे म्हणणे आहे.
हेही वाचा