मराठा उमेदवार आता निवडणुकीच्या मैदान! पुण्यासह मावळ, शिरूरमध्ये बैठकांचे सत्र | पुढारी

मराठा उमेदवार आता निवडणुकीच्या मैदान! पुण्यासह मावळ, शिरूरमध्ये बैठकांचे सत्र

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकारने मराठा समाजास दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. परंतु, हा निर्णय मराठा समाजास मान्य नाही. यामुळे मराठा समाजाने गावागावांत बैठका घेणे सुरू केले आहे. या बैठकांच्या माध्यमातून लोकसभेसाठी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला जात आहे. पुणे, मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीही मराठा समाजातून शेकडो उमेदवार अर्ज भरणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य सरकारने आरक्षण देतो, असे आश्वासन मराठा समाजाला दिले होते. मात्र, प्रत्यक्षात आरक्षण देताना ज्या मागण्या आंदोलक म्हणून मनोज जरांगे यांनी सरकारकडे केल्या होत्या, त्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले. ओबीसी प्रवर्गामधून आरक्षण देण्याची मागणी दुर्लक्षित करून विशेष 10 टक्के आरक्षण देऊन समाजाची बोळवण केली, अशी मराठा समाजाची भावना बनली आहे. त्यामुळे येत्या 24 मार्च रोजी जरांगे यांच्या मार्गदर्शनाखाली देशातील 14 राज्ये व महाराष्ट्रभरातील मराठा बांधवांची बैठक अंतरवाली सराटी येथे होणार आहे. त्यापूर्वीच मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बैठका घेऊन उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघामध्ये एकच बैठक पार पडली आहे. 24 तारखेला बैठक झाल्यानंतर नेमके किती मराठा समाजाचे उमेदवार राहतील, याची संख्या समोर येईल, असे मराठा समाजाकडून सांगण्यात आले.

प्रशासनाची करणार अडचण

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. लोकसभा निवडणुकीत प्रशासनाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न लोकशाही पद्धतीने मराठा समाजाकडून होणार आहे. त्यासाठी पुणे लोकसभा मतदारसंघातून शेकडो उमेदवार उभे करणार आहे.  384 पेक्षा जास्त उमेदवार उभे  राहिल्यास ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी लागते. मराठा समाजाकडून मोठ्या संख्येने उमेदवार उभे केले गेल्यास पुणे प्रशासनाला वेगळीच तयारी करावी लागणार आहे.

मावळ लोकसभेसाठी भरणार अर्ज

मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाज उमेदवार देणार आहे. मराठा समाजाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मावळ लोकसभा मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार आहे. आता दुसरीकडे मावळ लोकसभा मतदारसंघात मराठा समाजाकडून देखील उमेदवार देण्यात येणार आहे. त्यासाठी मावळ तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने गावोगावी बैठका घेण्यास सुरुवात केलेली आहे.

शिरूर मतदारसंघातील प्रत्येक गावातून उमेदवार

मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्यास पाठिंबा देण्यासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध मराठा समन्वयकांच्या बैठका पार पडल्या आहेत. खेड, जुन्नर, मंचर, शिरूर, शिक्रापूर, हडपसर, वाघोली आदी भागांतील प्रत्येक गावामधून किमान 2 ते 3 मराठा समाजाचे उमेदवार अर्ज भरणार आहेत. त्यामुळे शेकडोहून अधिकारी मराठा समाजाचे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात असणार आहेत.

हेही वाचा

Back to top button