केंद्र सरकारच्या टपाल विभागाने माय स्टॅम्प ही विशेष योजना सुरू केली आहे. जिल्ह्यात मात्र या योजनेला अल्प प्रतिसाद आहे. या योजनेचा जास्तीत-जास्त नागरिकांनी लाभ घेऊन आपल्या आठवणी पोस्टाच्या माध्यमातून जतन करून ठेवाव्यात, यासाठी नाशिक पोस्ट विभाग प्रयत्न करत आहे.
देशभरातील असामान्य व्यक्तींच्या कर्तृत्वाचा तसेच खेळाडूंचा, याचबरोबर सैन्यदलातील विविध कार्याचा सन्मान करण्यासाठी टपाल विभागामार्फत विशेष तिकिटे काढली जातात. तसेच प्राणी, पक्षी, सिनेजगतातील कलाकार, महापुरुष, विविध प्रकल्प यावरही तिकिटे काढली जातात. या सोबतच सर्वसामान्य नागरिकांना देखील माय स्टॅम्प या विशेष योजनेच्या माध्यमातून आपल्या छायाचित्राचे अथवा आपल्या आवडत्या गोष्टीचे टपाल काढता येण्याची व्यवस्था आहे. यासाठी ३०० रुपये मूल्य आकारण्यात येते. या बदल्यात आपला आवडता फोटो असलेली पाच रुपयांची १२ तिकिटे संबंधितांना मिळतात.
अशी आहे प्रक्रिया
राज्यातील कोणत्याही मुख्य टपाल कार्यालयात ३०० रुपयांत १२ टपाल तिकिटे सहज तयार करता येतात. ज्या व्यक्तीचे छायाचित्र तिकिटावर हवे असेल ती व्यक्ती समक्ष कार्यालयात हजर पाहिजे. त्या व्यक्तीचा आधार क्रमांकदेखील देणे आवश्यक आहे.
या थिम्स उपलब्ध
नाशिक टपाल कार्यालयामध्ये 'माय स्टॅम्प'साठी शुभेच्छापत्रक, फेरी क्वीन, अजिंठा लेणी, लग्न, वर्धापन दिन, सणवार अशा प्रकारच्या थिम्स उपलब्ध आहेत.
जिल्ह्यातील नागरिक व शालेय, व्यावसायिक संस्थांनी माय स्टॅम्प योजनेचा लाभ घ्यायला हवा. या माध्यमातून ज्यांना फिलाटेली हा छंद राबविण्यात आनंद आहे, त्यांना देखील या योजनेचा फायदा होऊ शकतो. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा. – पी. व्ही. परदेशी, वरिष्ठ पोस्ट मास्तर, नाशिक मुख्यालय.
हेही वाचा: