इस्राईल युद्धाचा द्राक्ष निर्यातीला फटका! मालवाहतूक खर्चात वाढ | पुढारी

इस्राईल युद्धाचा द्राक्ष निर्यातीला फटका! मालवाहतूक खर्चात वाढ

पुणे : पुढारी वृत्तसेवा : भारताकडून युरोपमध्ये थेट होणार्‍या द्राक्ष निर्यातीला इस्राईलच्या युध्दाचा फटका बसला आहे. विशेषतः दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जहाजाद्वारे होणार्‍या निर्यातीमुळे वाहतुकीच्या खर्चात जादा वाढ, अधिक वेळ जाण्यामुळे द्राक्षांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, देशातून सध्या 88 हजार 493 टन द्राक्ष निर्यात झाली असून, 744 कोटींचे परकीय चलन प्राप्त झाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 715 कोटी रुपयांचा आहे. केंद्राच्या अपेडा संस्थेकडून डिसेंबर 2023 अखेरची आकडेवारीच सध्या उपलब्ध झाली आहे. मात्र, जानेवारीसह फेब्रुवारी आणि मार्च महिन्यातील झालेल्या निर्यातीचा आकडा सध्या अपेडाच्या संकेतस्थळावर उपलब्ध नसला तरी तो अधिक राहणार आहे.

या बबत माहिती देताना कृषी विभागाचे सेवानिवृत्त तंत्र अधिकारी आणि कृषी निर्यात सल्लागार गोविंद हांडे म्हणाले, युरोपियन युनियनशिवाय सौदे अरेबिया, दुबई, नेपाळ, मलेशिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया या देशांनाही द्राक्ष निर्यातीची संधी आहे. निर्यातीमुळे देशांतर्गत बाजारातही शेतकर्‍यांना अधिक दर मिळणे अपेक्षित आहे. भारतीय द्राक्षांची आयात करणार्‍या युरोपियन द्राक्ष आयातदारांकडून खरेदीच्या करण्यात आलेल्या सौद्यांपेक्षा प्रत्यक्षात वाहतुकीतील बदलाचा फटका महाग द्राक्षे मिळण्यावर झाला आहे. त्यामुळे सध्याच्या स्थितीत नवीन तंत्रज्ञान, वाहतुकीच्या नवीन मार्गांचा शोध आणि उत्पादनांच्या साठवणुकीच्या पद्धतींमध्ये सुधारणा करून संकटावर मात करावी लागणार असल्याचे ते म्हणाले.

“इस्राईल युध्दापूर्वी सुएझ कालव्यातून थेट युरोपला होणारी द्राक्ष निर्यात आता केपटाऊनला वळसा घालून होत आहे. पूर्वी जहाजाद्वारे मुंबईहून 18 ते 20 दिवसांत पोहचणारी द्राक्षे आता 40 ते 45 दिवसांत जाण्यामुळे वाहतूक खर्चात मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात गारपीट, अवेळीच्या पावसामुळे वाचलेला बागांमधून विशेषतः नाशिक जिल्ह्यातून द्राक्ष निर्यात सध्या सुरू आहे. बांगलादेशने द्राक्षांवरील आयात शुल्कात वाढ केल्यामुळे दरवर्षीपेक्षा कमी निर्यात होण्याची शक्यता आहे. मागणीनुसार रशिया व दुबईला द्राक्ष निर्यात सुरू आहे. दरम्यान, नाशिक बाजारपेठेत प्रतिकिलोस द्राक्षांचा घाऊक दर 30 ते 40 रुपये किलो आहे.

– जगन्नाथ खापरे, अध्यक्ष, अखिल भारतीय द्राक्ष निर्यातदार संघटना, नाशिक

हेही वाचा

Back to top button