ऑनलाइन-दुरस्थ घ्या प्रवेश; यूजीसीकडून प्रवेशाची नियमावली जाहीर | पुढारी

ऑनलाइन-दुरस्थ घ्या प्रवेश; यूजीसीकडून प्रवेशाची नियमावली जाहीर

पुणे : पुढारी वृत्तसेवा : विद्यार्थ्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये ऑनलाइन किंवा दुरस्थ पध्दतीने येत्या 31 मार्चपर्यंत प्रवेश घ्यावा. तसेच प्रवेश घेत असताना शैक्षणिक संस्थांची गुणवत्ता तपासावी. त्यासाठी कोणत्याही जाहिराती अथवा भूलथापांना बळी न पडता आवश्यक ती सर्व काळजी घेऊनच प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यापीठ अनुदान आयोग अर्थात यूजीसीने केले आहे. देशातील विविध शैक्षणिक संस्थामध्ये ऑनलाइन किंवा दुरस्थ पध्दतीने विविध अभ्यासक्रम राबविण्यात येत आहेत. या अभ्यासक्रमांना प्रवेश घेताना नेमकी काय काळजी घ्यावी यासंदर्भात यूजीसीने एक पब्लिक नोटीस जाहीर केली आहे.

त्यानुसार विद्यार्थ्यांनी प्रवेश घेताना शैक्षणिक संस्थांचे अगोदर संलग्नीकरण तपासणे गरजेचे आहे. यामध्ये संबंधित संस्था ऑनलाइन किंवा दुरस्थ अभ्यासक्रमासाठी पात्र आहे का याची यूजीसीच्या संकेतस्थळावर जाऊन विद्यार्थ्यांनी पाहणी करणे गरजेचे आहे. जो अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना शिकायचा आहे तो अभ्यासक्रम यूजीसीच्या ऑनलाइन किंवा दुरस्थ अभ्यासक्रमांच्या यादीत समाविष्ट आहे का याचीदेखील पाहणी करणे गरजेचे आहे. शैक्षणिक संस्थांनीदेखील ऑनलाइन किंवा दुरस्थ अभ्यासक्रमासंदर्भातील माहिती यूजीसीच्या वेबसाईटवर अपलोड करणे आवश्यक आहे. यामध्ये समुचित प्राधिकरणांची परवानगी आणि अभ्यासक्रमाविषयी महत्त्वाची माहिती अपलोड करणे गरजेचे असल्याचेदेखील यूजीसीने स्पष्ट केले आहे.

या संस्थांमध्ये प्रवेश घेऊ नका

नरसी मोन्जी इन्स्टिट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अर्थात एनएमआयएमएस, श्रीव्यंकटेश्वरा युनिव्हर्सिटी, आंध— प्रदेश, पेरीयार युनिव्हर्सिटी, तामिळनाडू या शैक्षणिक संस्थांमध्ये विद्यार्थ्यांना 2024 या शैक्षणिक वर्षामध्ये ऑनलाइन किंवा दुरस्थ अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येणार नसल्याचे यूजीसीने स्पष्ट केले आहे.

हे अभ्यासक्रम ऑनलाइन किंवा दुरस्थ नाही

अभियांत्रिकी, वैद्यकीय, फिजीओथेरपी, पॅरामेडीकल अभ्यासक्रम, फार्मसी, दंतवैद्यकीय, नर्सिंग, आर्किटेक्चर, लॉ, अ‍ॅग्रीकल्चर, हॉर्टिकल्चर, हॉटेल मॅनेजमेंट, केटरींग टेक्नोलॉजी, कलीनरी सायन्स, एअरक्राफ्ट मेंटनन्स, व्ह्युज्वल आर्ट्स अ‍ॅण्ड स्पोर्ट्स , एव्हीएशन, योगा, टुरीझम, हॉस्पिटॅलिटी आदी अभ्यासक्रम ऑनलाइन किंवा दुरस्थ पध्दतीने करता येणार नसल्याचेदेखील यूजीसीने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button