भवानी पेठ : तमाशात 'संगीतबारी' चालविण्यासाठी शासनाकडून वर्षाला 'पार्टी' मालकिणीला निधी मिळतो, तसेच प्रत्येक कलावंताला महिन्याला मानधन मिळत नसल्याची चिंता पुण्यातील आर्यभूषण थिएटर कलावंत व्यक्त करीत आहेत. महाराष्ट्रातील कलावंतांना शासनाकडून महिन्याला तुटपुंजे मानधन दिले जाते तर पार्टी मालकिणीला वर्षाला सुमारे अडीच लाख रुपये मिळते, यासाठी मालकिणीकडून कलावंताची कागदपत्रे व सह्या घेण्यात येतात, त्या वेळी तो निधी मिळतो. शासनाने हा निधी प्रत्येक कलावंताच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली जात आहे.
त्याचप्रमाणे महिन्याला खर्या कलावंतांना मानधन शासन देते. पण, प्रत्यक्ष तमाशा कलावंतांना शासकीय लाभ पोहोचत नाही तर बोगस कलावंत दाखवून महिन्याचा निधी लाटला जातो, यासाठी शासनाने समिती नेमून महाराष्ट्रातील थिएटरची चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तमाशा कलावंतांचा हा पारंपरिक व्यवसाय असल्याने त्यांना मानधनाची आवश्यकता आहे, यात ढोलकी, हार्मोनियम, तबला आदी वाद्य वाजवणार्यांचा समावेश आहे, तसाच गायकांचाही समावेश आहे. खर्या कलावंतांना मानधन मिळण्यासाठी चौकशी करून त्यांची चाचणी घ्यावी, खरंच लाभधारक कलावंतांना वाद्य वाजवता येते का? याची खातरजमा होणे आवश्यक आहे. तमाशा थिएटरमधील तमाशा बंद झाल्यामुळे कलावंतांना 'संगीतबारी'चा कार्यक्रम करूनच आपला उदरनिर्वाह चालवावा लागतो.
आर्यभूषण थिएटरला वगनाट्याचे कार्यक्रम होत होते. निळू फुले, लीला गांधी, राम कदम, वसंत पवार, उषा चव्हाण, मधू कांबीकर, मंगला बनसोडे, सरस्वतीबाई कोल्हापूरकर, अमोल तांबे पुणेकर, रघुवीर खेडकर, तुकाराम खेडकर, कांताबाई सातारकर, भाऊ बापू मांग, विठाबाई, काळू- बाळू आदींनी या थिएटरला काम केले आहे. आर्यभूषणचे मूळ मालक अहमद शेठ तांबे होते, ते कलावंतांना चांगले सांभाळत होते. अडीअडचणींना आर्थिक हातभार लावत होते. सद्यःस्थितीत महाराष्ट्रातील थिएटर मालकांचे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्रात संगीतबारीचे 270 पैकी केवळ 80 कार्यक्रम सध्या चालू आहेत. संगीतबारीच्या एका बैठकीतून तुटपुंजी रक्कम एका कलावंताला मिळते. मात्र, ग्रुप पार्टीच्या मालकांना शासनाचा लाभ मिळतो. कलावंतांच्या नावाखाली वार्षिक लाभ फड मालकीण घेत असते, असे मत हार्मोनियम वादक व गायक मधुकर कांबळे यांनी व्यक्त केले. याबाबत थिएटरचे व्यवस्थापक राहील तांबे यांच्याशी संपर्क केला असता होऊ शकला नाही.
संगीतबारीत तमाशा नावाची चीजच राहिली नाही, व्याजाने पैसे घेऊन संसार करावा लागतो, मुलांचे शिक्षण करावे लागते. कलावंत म्हटले, तर डोंबारी, कोल्हाटी समाजासह इतर जातीचे कलाकार येतात. तमाशात वस्ताद, मास्तर, सोंगाड्यासारखे अनेक पात्रे केली जातात. पारंपरिक वाद्य ढोलकी, तबला, पेटी याचा वापर करून लोककलेचे सादरीकरण केले जात असताना शासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही, आमच्या मुलांना शैक्षणिक लाभ मिळत नाही, थिएटर मालकांकडून कलावंतांना संरक्षण मिळाले पाहिजे.
– शिवाजी जावळीकर, पुणे जिल्हाध्यक्ष, उत्कर्ष लोकवंत कलाकार सेवाभावी असो.
हेही वाचा