पुणे : पुढारी वृत्तसेवा : लहान-सहान गोष्टींवरून होणारी चिडचिड… मागणी लगेच पूर्ण न झाल्यास चढणारा रागाचा पारा… एकाग्रता, संयमाचा अभाव… चांगले-वाईट यातील फरक समजून न घेता एखाद्या गोष्टीमध्ये वाहवत जाणे… अशी किशोरवयीन मुलांमधील लक्षणे अनेक पालकांना दररोज अनुभवायला लागतात. वाढत्या वयातील मुलांचे हे वागणे म्हणजे मानसिक अस्वास्थ्याचे लक्षण असल्याचे मानसोपचारतज्ज्ञांनी अधोरेखित केले आहे.
मुलांच्या सर्वांगीण आरोग्यासाठी शारीरिक आरोग्यासह मानसिक आरोग्यही अत्यंत महत्त्वाचे असते. घरातील वातावरणाचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे घरात सातत्याने चिडचिड, भांडणे, अबोला, विसंवाद, असे प्रकार घडत असतील तर मुलांचे मानसिक आरोग्य बिघडते. मुले कुटुंबातील गोष्टींचे अनुकरण करतात. त्यामुळे मुलांच्या कळत्या वयापासून पालकांनी आत्मपरीक्षण करून, संयम बाळगून स्वत:च्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक मानले जात आहे.
मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निकिता लिमये म्हणाल्या, वाढत्या वयात मुलांच्या शरीरातील हॉर्मोनमध्ये बदल होतात. यामुळे त्यांच्या भावना, वागणे यातही कमालीचा बदल जाणवतो. एकीकडे अभ्यासाचे दडपण, दुसरीकडे बाहेरच्या जगातील मोह, अशा कचाट्यात मुले अडकलेली असतात. अशा वेळी त्यांना पालकांकडून प्रेमळ पाठिंबा न मिळाल्यास मुलांचे मानसिक स्वास्थ्य बिघडू शकते. त्यामुळे मुलांमध्ये कोणतीही लक्षणे दिसल्यास मुलांना सांभाळून घेणे, संवाद साधणे हे पालकांचे काम आहे.
हेही वाचा