कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेत रस्सीखेच; उमेदवारी गुलदस्त्यात | पुढारी

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात भाजप-शिवसेनेत रस्सीखेच; उमेदवारी गुलदस्त्यात

सतीश सरीकर

कोल्हापूर : महाविकास आघाडीने कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी शाहू महाराज यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब केले. अधिकृतपणे उमेदवारी जाहीर झाली नसली, तरीही शाहू महाराज यांनी प्रचाराचे रणशिंगही फुंकले आहे. मात्र, महायुतीतील कोणत्या पक्षाकडे हा मतदारसंघ जाणार याबाबत अद्याप त्रांगडं कायम आहे. परिणामी, कोल्हापूरच्या जागेबाबत महायुतीतील भाजप व शिवसेना या पक्षांत जोरदार रस्सीखेच सुरू असल्याने अद्याप महायुतीचा पक्ष गुलदस्त्यात अन् उमेदवाराबाबत सस्पेन्स, अशी स्थिती आहे.

दरम्यान, खा. मंडलिक यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची काही खासदारांसोबत भेट घेऊन उमेदवारीची मागणी केली आहे. यावेळी त्यांच्यासोबत खा. राहुल शेवाळे, खा. श्रीरंग बारणे, खा. कृपाल तुमाने, खा. सदाशिव लोखंडे, खा. भावना गवळी आदी उपस्थित होते.
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्याने लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. पक्षीय पातळीवरही हालचाली गतिमान झाल्या आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात थेट लढत होणार, हे स्पष्ट आहे. त्यामुळे राज्यभरातील उमेदवारांची यादी जाहीर करून महायुतीने आघाडी घेतली आहे. जेणेकरून आतापासूनच संबंधित उमेदवारांना प्रचाराचा नारळ फोडून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा फायदा उठवता येईल. मात्र, महाविकास आघाडीने काही मतदारसंघांतील उमेदवार निश्चित केले असले, तरीही अद्याप त्यांची यादी जाहीर केलेली नाही. महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाबाबत महाविकास आघाडीने सरशी घेतली आहे. भाजप-शिवसेना शिंदे गटात त्याबाबत रस्सीखेच सुरू आहे.

ज्या पक्षाचे विद्यमान खासदार त्या पक्षाचा मतदारसंघावर अधिकार यानुसार शिवसेना शिंदे गटाने कोल्हापूरवर आपला हक्क सांगितला आहे. मात्र, महाविकास आघाडीने थेट राजघराण्यातील व्यक्तीलाच निवडणूक रणांगणात उतरविल्याने भाजपसुद्धा राजघराण्यातील व्यक्तीला मैदानात उतरविण्यासाठी प्रयत्नशील आहे. तसे झाल्यास शाहू महाराज विरुद्ध समरजित घाटगे अशी लढत होईल. परंतु, विद्यमान खा. मंडलिक यांनीही निवडणुकीसाठी शड्डू ठोकला आहे. कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. प्रसंगी बंडखोरी करण्यासाठीही त्यांनी तयारी केली आहे. तसेच राज्यसभेचे खा. महाडिक यांनीही पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवू,असे जाहीर केले आहे. त्यामुळे महायुतीच्या उमेदवाराबाबत अद्याप संभ—मावस्था आहे.

मंडलिकांच्या उमेदवारीबाबत संभ—मावस्था; पण लढण्यावर ठाम…

शिवसेनेचे खा. मंडलिक यांनी कोणत्याही स्थितीत निवडणूक लढविणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासाठी स्वतः त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. परंतु, शिवसेनेतूनच त्यांच्या उमेदवारीसाठी विरोधाचा काहींनी उघड पवित्रा घेतला आहे. मूळ शिवसेनेत फूट पडल्यानंतर खा. मंडलिक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साथ दिली. मात्र, खा. मंडलिक यांच्या उमेदवारीबाबत शिवसेनेच्या बंडखोरीमुळे त्यांना राजकीय फटका बसतो का, अशी स्थिती आहे. कारण शिवसेनेकडून अद्याप उमेदवारीबाबत ठोस निर्णय न झाल्याने खा. मंडलिक हेसुद्धा संभ—मावस्थेत आहेत. पण, काहीही झाले तरी लोकसभा निवडणूक लढणारच, या भूमिकेवर खा. मंडलिक ठाम आहेत.

अडसर दूर, की थेट लढत…

भाजपने शाहू साखर कारखान्याचे समरजित घाटगे यांना लोकसभा रिंगणात उतरविण्यासाठी जोरदार प्रयत्न चालविले आहेत. मात्र, महाविकास आघाडीचे शाहू महाराज यांच्याविरुद्ध लढण्यास घाटगे तयार नाहीत. काही दिवसांपूर्वी घाटगे यांनी कागलमध्येच कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आपले लक्ष्य कागल विधानसभा मतदारसंघ असल्याचे जाहीर केले आहे. तरीही लोकसभा निवडणुकीसाठी घाटगे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. घाटगे लोकसभा निवडणूक लढल्यास पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना कागलमधील मार्ग विनासायास सुकर होणार आहे. अन्यथा विधानसभेसाठी पालकमंत्री मुश्रीफ आणि घाटगे यांच्यात राजकीय टक्कर पहावयास मिळणार आहे. परिणामी, पालकमंत्री मुश्रीफ यांचा अडसर दूर होणार, की दोघांत थेट लढत होणार, याची उत्सुकता जिल्ह्यासह पश्चिम महाराष्ट्राला लागली आहे.

Back to top button