Srinivas Pawar On Ajit Pawar | सूज्ञ बारामतीकरांचे मत…; श्रीनिवास पवार यांच्या टीकेला अजित पवार गटाकडून उत्तर | पुढारी

Srinivas Pawar On Ajit Pawar | सूज्ञ बारामतीकरांचे मत...; श्रीनिवास पवार यांच्या टीकेला अजित पवार गटाकडून उत्तर

बारामती : पुढारी वृत्तसेवा : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अजून महिनाभराचा कालावधी हाती असतानाच बारामतीचे रण चांगलेच तापले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांनीच तोफ डागल्यानंतर आता अजित पवार गटाचे कार्यकर्तेही कमालीचे आक्रमक झाले आहेत. एका निनावी पत्राद्वारे त्यांनी श्रीनिवास पवार यांच्या टीकेला उत्तर दिले असून लागलीच शरद पवार गटानेही त्याला प्रत्युत्तर दिले आहे. Srinivas Pawar On Ajit Pawar

महायुतीत बारामतीची जागा राष्ट्रवादीला दिल्याचे अजून घोषित झालेले नाही. राष्ट्रवादीनेही इथे उमेदवाराची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशीच लढत होणार, हे आता निश्चित झाले आहे. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होणारी ही पहिलीच मोठी निवडणूक आहे. त्यात पवार विरुद्ध पवार अशी इतिहासात पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने या लढतीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा प्रचार कुटुंबातील लोक करणार नाहीत. हे आता स्पष्ट झाले आहे. त्यांची दोन मुले व पत्नी एका बाजूला आणि कुटुंब दुसऱ्या बाजूला अशी स्थिती आहे. त्यात सख्खे बंधू श्रीनिवास, भावजय शर्मिला यांनीही शरद पवार यांचे काम करणार असल्याचे सांगितले. विशेषतः श्रीनिवास यांनी अजित पवार यांचा काटेवाडीत जोरदार समाचार घेतला. Srinivas Pawar On Ajit Pawar

सहाजिकच या घटनेच पडसाद उमटू लागले आहेत. अजित पवार गट आक्रमक झाला आहे. त्यांनी सूज्ञ बारामतीकरांचे मत या नावे एक पत्र सोशल मिडियावर फिरवले आहे. त्यात श्रीनिवास यांचे बोलणे म्हणजे खोटा सहानुभूतीदार असल्याचे म्हटले आहे. नालायक हा शब्द श्रीनिवास यांनी किती सहजपणे वापरला. पण तो वापरताना आपण बारामतीकरांसाठी काय केले, असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. अजित पवार यांनी राजकारणात कर्तृत्वाच्या जोरावर स्थान मिळविले आहे. त्यांच्या कामाच्या झपाट्याबद्दल खुद्द शरद पवार यांनी वेळोवेळी कबुली दिली आहे. फक्त काका मिळून चालत नाही, तर त्या कसोटीला उतरण्यासाठी कर्तृत्व, दातृत्व व नेतृत्व गुण लागतात, असा टोला लगावण्यात आला आहे.

आपण सपत्निक पुढे येत अजित पवार यांच्याबद्दल मत व्यक्त केले. त्यात स्वार्थ लपलेला असावा, अशी शंका उपस्थित केली आहे. अजित पवार यांना कायम व्हिलन ठरविणाऱ्या हातातील तुम्ही खेळणे झाला असावा किंवा बायको-पोराच्या राजकीय महत्त्वकांक्षेपोटी हे पाऊल उचलले असावे. बारामतीकर खोट्या सहानुभूतीदाराच्या नव्हे, तर विकास पुरुषाच्याच मागे उभे राहतील, असे या पत्रात म्हटले आहे.

Srinivas Pawar On Ajit Pawar : शरद पवार गटाकडूनही प्रत्युत्तर

अजित पवार यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर फिरणाऱ्या या पत्राला शरद पवार गटानेही लगोलग प्रत्युत्तर दिले आहे. हे पत्र लाभार्थ्यांकडून सोशल मीडियात फिरवले जात असून त्यातील मत हे लाभार्थी बारामतीकरांचे आहे, जे की मूळ लोकसंख्येच्या एक टक्केही नसल्याचा टोला लगावण्यात आला आहे. उरलेले स्वाभिमानी बारामतीकर या पत्राशी सहमत नाहीत. एका लाभार्थ्याचे मत संपूर्ण स्वाभिमानी बारामतीकरांचे असू शकत नाही, असे या गटाने प्रत्युत्तर दिले.

हेही वाचा 

Back to top button