पीक कर्जाची केवळ मुद्दलच वसूल करा : सहकार आयुक्तालयाची सूचना | पुढारी

पीक कर्जाची केवळ मुद्दलच वसूल करा : सहकार आयुक्तालयाची सूचना

पुणे : पुढारी वृत्तसेवा : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेनुसार हंगाम 2023-24 मधील पीक कर्जाची दिलेल्या मुदतीपूर्वी परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांकडून फक्त कर्ज मुद्दल रकमेची वसुली करावी व व्याजवसुली करू नये, अशी महत्त्वपूर्ण सूचना सहकार आयुक्तालयाने सर्व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना नुकतीच दिली आहे. तसेच, अशा शेतकर्‍यांना पुढील पीक कर्जासाठी पात्र ठरविण्यात यावे, असेही म्हटले आहे. त्यामुळे नियमित पीक कर्जाची रक्कम व्याजासह वसूल करण्याच्या जिल्हा बँकांच्या पवित्र्यास चपराक बसली आहे.

नियमित पीक कर्ज परतफेड केले, तरी बहुतांश जिल्हा बँका मार्च महिन्यात शेतकर्‍यांकडून व्याजही वसूल करीत आहेत. अर्थात, विकास सोसायट्यांकडून ही कर्जे व व्याजवसुली होते. तसेच, शासनाकडून व्याजाची रक्कम योजनेनुसार मिळाल्यावर शेतकर्‍यांच्या खात्यावर ती जमा करण्यात येत आहे. त्यामुळे योजनेत सवलत असूनही शेतकर्‍यांना कर्ज आणि व्याज रक्कम एकाचवेळी भरण्याने येणारा आर्थिक ताण सहकारच्या सूचनेमुळे बसणार नसल्याने दिलासा मिळाला आहे. सहकार आयुक्तालयातील अपर निबंधक (पतसंस्था) श्रीकृष्ण वाडेकर यांनी राज्यातील सर्व जिल्हा बँकांना (मुंबई वगळून) एक पत्राद्वारे गुरुवारी (दि. 15) या सूचना दिलेल्या आहेत. जे शेतकरी पीक कर्जाची परतफेड प्रत्येक वर्षी दिलेल्या मुदतीत करीत असल्यास अशा शेतकर्‍यांकडून त्यांना देय असलेल्या प्रोत्साहनपर व्याज अनुदानाची रक्कम वजा करून परतफेडीची रक्कम वसूल करण्याबाबत व त्याप्रमाणे सवलत दिलेल्या रकमेच्या प्रतिपूर्तीकरिता बँका, संस्थांनी शासनाकडे मागणी करण्याच्या सूचनाही वाडेकर यांनी दिल्या आहेत.

फक्त मुद्दल रक्कम वसूल करा, व्याजाचा आग्रह नको : पीडीसीसी बँक

सहकार विभागाच्या प्राप्त सूचनान्वये वर्ष 2023-24 च्या पीक कर्जाच्या वसुलीमध्ये दिलेल्या मुदतीपूर्वी परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांच्या फक्त कर्ज मुद्दल रकमेची वसुली करावी व अशा शेतकर्‍यांना प्रोत्साहनपर व्याज अनुदानाचा आगाऊ लाभ देण्यात यावा. अशा शेतकर्‍यांना पुढील पीक कर्जासाठी पात्र ठरविण्यात यावे. त्यानुसार प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्थांनी अंमलबजावणी करण्याच्या सूचना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (पीडीसीसी) मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई यांनी दिल्या आहेत.

हेही वाचा

Back to top button