Pune Crime News: अरणगाव येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू; साडेसात तोळे सोने लांबवले | पुढारी

Pune Crime News: अरणगाव येथे दरोडेखोरांच्या मारहाणीत महिलेचा मृत्यू; साडेसात तोळे सोने लांबवले

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : अरणगाव येथील ठोंबरेवस्ती येथे सोमवारी (दि. १८) पहाटेच्या सुमारास दरोडेखोरांनी एका घरात घुसून दाम्पत्याला गंभीर मारहाण करत साडेसात तोळे सोन्याचे दागिने लांबवले. दरोडेखोरांच्या मारहाणीत फुलाबाई आनंदा ठोंबरे या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर आनंदा सावळेराम ठोंबरे हे गंभीर जखमी झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे दरोडेखोरांनी यावेळी ठोंबरे यांच्या घरातील इतर खोल्या बंद करून ठेवल्या हाेत्या. Pune Crime News

अरणगाव (ता. शिरुर) येथील ठोंबरेवस्ती येथे राहणारे बाबा ठोंबरे यांचे कुटुंब रात्रीच्या सुमारास झोपले होते. सोमवारी पहाटे ३ च्या सुमारास बाबा यांना आई-वडील झोपलेल्या खोलीत काहीतरी हालचाल सुरु असल्याची बाब जाणवल्याने त्यांनी शेजारील गोविंद माने यांना फोन करुन घरी बोलावले. काही वेळात माने तेथे आले असता बाबा ठोंबरे यांच्या खोलीला बाहेरुन कुलूप लावल्याचे दिसले, तर बाबा यांची मुले झोपलेल्या खोलीला देखील बाहेरुन कड्या होत्या. यावेळी बाबा यांच्या मुलांनी बाबा यांच्या खोलीला लावलेले कुलूप तोडले. त्यांनतर बाबा यांचे आई-वडील झोपलेल्या खोलीची पाहणी केली असता त्यांच्या खोलीचा दरवाजा उघडा होता. त्यामुळे आतमध्ये जाऊन पाहणी केली असता फुलाबाई ठोंबरे व आनंदा ठोंबरे हे दोघे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याने दिसून आले. Pune Crime News

याबाबतची माहिती मिळताच शिक्रापूरचे पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या पथकासह पोलिस पाटील संतोष लेंडे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. यामध्ये फुलाबाई आनंदा ठोंबरे (वय ६५, रा. ठोंबरेवस्ती अरणगाव, ता. शिरुर) यांचा जागीच मृत्यू झाल्याचे तर आनंदा सावळेराम ठोंबरे (वय ७०, रा. ठोंबरेवस्ती अरणगाव, ता. शिरुर) हे जखमी झाल्याचे दिसून आले. दरोडेखोरांनी या दाम्पत्याला जबर मारहाण करुन घरातील तब्बल साडेसात तोळे वजनाचे सोन्याचे दागिने लांबवल्याचे यावेळी समोर आले.

त्यांनतर अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे व उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आणि श्वान पथकाला पाचारण केले; मात्र दरोडेखोरांचा काही थांगपत्ता लागला नाही. शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत बाबा आनंदा ठोंबरे (वय ४७, रा. ठोंबरेवस्ती अरणगाव, ता. शिरुर) यांनी फिर्याद दिली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दरोडेखोरांवर गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सतीश पवार हे या घटनेचा तपास करीत आहेत.

हेही वाचा 

Back to top button