नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यातील बिगरपेसा क्षेत्रातील तलाठी भरतीअंतर्गत १७३ जणांची निवड यादी जिल्हा प्रशासनाने घोषित केली आहे. त्याबरोबर १७२ उमेदवारांची प्रतीक्षा यादीही प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यामुळे लवकरच जिल्ह्याला नवीन तलाठी मिळणार आहेत.
राज्यभरात एकाचवेळी तलाठी भरतीसाठीची प्रक्रिया राबविण्यात आली. न्यायालयाच्या आदेशानुसार नाशिकसह १३ जिल्ह्यांतील पेसा क्षेत्रातील भरती वगळता, बिगरपेसा क्षेत्रासाठी जानेवारी महिन्यात परीक्षा घेण्यात आली. मात्र, २०० गुणांची परीक्षा असताना काही उमेदवारांना २१४ गुण प्राप्त झाल्याने एकूणच प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उभे ठाकले होते. त्यामुळे शासनाने गुणांबाबत सुधारित यादी जाहीर केली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने १७३ उमेदवारांची निवड यादी तयार करून ती प्रसिद्ध केली आहे. त्यासोबत प्रतीक्षा यादीही देण्यात आली आहे.
जिल्हा प्रशासनाने तलाठी भरतीसाठी यादी प्रसिद्ध केली असली, तरी बिगरपेसा क्षेत्रातील प्रत्येक जागेची तपासणी करून त्यानुसार नियुक्ती देण्याची तयारी केली आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे ३१ ऑगस्ट २०२३ च्या स्थितीनुसार त्यावेळी रिक्त जागा व त्या प्रमाणात अनुशेष भरण्यासाठीचे नियोजन प्रशासनाने केले होते. परंतु, मागील सात महिन्यांत काही तलाठ्यांची पदोन्नती झाली असून, बरेच तलाठी हे सेवानिवृत्त झाले. त्यामुळे बिगरपेसा क्षेत्रात नियुक्त देताना रिक्त जागांचा अनुशेष तपासला जाणार आहे. तसेच पेसा क्षेत्रासंदर्भात पुढची प्रक्रिया ही राबविली जाईल, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
१७३ पदांची निवड यादी प्रवर्ग संख्या
अनुसूचित जाती : १७ अनुसूचित जमा : ०५ विमुक्त जाती (अ) : १० भटक्या (ब): ०२ भटक्या जमाती (क) : ०७ भटक्या जमाती (ड) : ०१ विशेष मागास प्रवर्ग : ०५ इतर मागास प्रवर्ग : ३२ आर्थिकदृष्ट्या दुर्बल : १८ अराखीव पदे (खुली): ७६ एकूण : १७३