Loksabha election | सावधान ! बडा व्यवहार करताय? बँकांची असेल करडी नजर | पुढारी

Loksabha election | सावधान ! बडा व्यवहार करताय? बँकांची असेल करडी नजर

दिगंबर दराडे

पुणे : लोकसभा निवडणुकीकरिता जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली आहे. यादरम्यान पैशांचे व्यवहार केले जातात. अशा व्यवहारांवर प्रशासनाने करडी नजर ठेवली आहे. मोठ्या रकमांचे गैरप्रकार आढळल्यास तत्काळ कारवाई करण्यात येणार आहे.  निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांनुसार, पुणे जिल्ह्यातील सर्व बँकांकडून होणार्‍या व्यवहारांची माहिती आयोगाकडे सादर करण्याबाबतची कार्यवाही करण्याकरिता  जिल्हास्तरीय बँक समन्वयक  म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानुषंगाने सर्व बँकांनी त्यांच्याकडील समन्वय अधिकारी यांची नियुक्ती करून तसे जिल्हाधिकारी कार्यालयाला तत्काळ कळवावे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सुहास दिवसे यांनी सूचित केले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाकडील प्राप्त निर्देशानुसार आगामी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीचे कामकाज हे विहित कालावधीत पूर्ण करण्याबाबतची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक 2024 याकरिता निवडणूक आयोगाने राष्ट्रीयीकृत बँका, को-ऑपरेटिव्ह बँका आणि खासगी बँकांकडून रोख रक्कम रेमिटन्सद्वारे आणावयाची असेल किंवा पाठवायची असेल, तसेच रोखीचे मोठे व्यवहार होत असतील, तर त्याकरिता संबंधित बँकेच्या प्रत्येक शाखेच्या शाखा प्रबंधकांना एक क्यूआर कोड देण्यात येणार आहे. त्याकरिता प्रत्येक बँकेने त्यांच्या मुख्य शाखेतून एक नोडल ऑफिसरची नेमणूक करणे आवश्यक आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार, मुख्य बँकेतील नोडल ऑफिसरचे यूजर आयडी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून तयार करून दिले जाईल आणि त्या नोडल ऑफिसरने त्यांच्या बँकेच्या सर्व शाखा प्रबंधकांचे यूजर आयडी तयार करणे आवश्यक आहे.
 प्रत्येक गोष्टीचा हिशेब द्यावा लागणार आहे. व्यवहार करत असताना बँकेचे अधिकारी आणि संबंधित अधिकार्‍यांनी रोख रकमेची आणि व्यवहाराची पारदर्शकपणे पडताळणी करावी. चुकीचे आढळल्यास तत्काळ कारवाई करावी.
– डॉ. सुहास दिवसे, निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी पुणे
आचारसंहितेच्या काळात सरकारी गाडी, सरकारी बंगला किंवा सरकारी विमानाचा वापर निवडणूक प्रचारासाठी करण्यास मनाई आहे. प्रचार सभा, रॅली किंवा मिरवणूक काढायची असेल तर पोलिसांची पूर्वपरवानगी गरजेची असते. धर्म, जाती, पंथ याआधारे मतदारांना मत देण्याचे आवाहन करू नये.
– अजय मोरे, निवडणूक निर्णय अधिकारी, शिरूर लोकसभा 
हेही वाचा

Back to top button