विकासकामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये : आ. अशोक पवार

विकासकामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये : आ. अशोक पवार

शिरूर : पुढारी वृत्तसेवा : शिरूर शहरातील 72 कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनांना मंजुरी मिळाली आहे. या योजनेच्या जागेचा प्रश्नही सुटला आहे. या कामाचे कुणीही फुकटचे श्रेय घेऊ नये. ज्यांनी काम केले त्यांना श्रेय द्या, असा टोला शिरूर हवेलीचे आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना त्यांचे नाव न घेता लगावला. शिरूर शहरातील पाबळ फाटा ते मुलींचे शासकीय वसतिगृह या चार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन अ‍ॅड. पवार यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) रात्री उशिरा झाले, त्या वेळी ते बोलत होते.

शिवसेना तालुकाप्रमुख पोपटराव शेलार, शहरप्रमुख संजय देशमुख, राष्ट्रवादी शहराध्यक्ष मुज्जफर कुरेशी, माजी नगराध्यक्षा वैशाली वाखारे, विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, माजी नगरसेवक संतोष भंडारी, काँग्रेसचे अमजद पठाण, माजी नगरसेविका मनीषा गावडे, उज्वला बरमेचा, संगीता मल्लाव, अलका सरोदे, सुवर्णा लटांबळे, सुनीता कालेवार आदींसह नागरिक उपस्थित होते.
आमदार अ‍ॅड. पवार पुढे म्हणाले, उद्योगपती प्रकाश धारिवाल यांच्या नेतृत्वाखाली शिरूर शहराचा चेहरामोहरा बदलत आहे.
धारिवाल यांनी विकासकामांमध्ये गुणवत्तेला महत्त्व दिले.

शहरात एस. टी. स्टॅण्ड, न्यायालयीन इमारत, सार्वजनिक बांधकाम विभागाचे विश्रामगृह, कार्यालय तसेच शहरातील अनेक रस्त्यांची कामे सुरू आहेत. ही सर्व कामे महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुरू असून भविष्यात शहराला क्रीडांगणासाठी प्रयत्न करणार आहे. नवीन पाणीपुरवठा योजनेमुळे स्वच्छ तसेच उन्हाळ्यातही सुरळीत पाणीपुरवठा होईल. शहरातील झोपडपट्टीमधील नागरिकांसाठी घरकुल योजना राबविणार असल्याचे अ‍ॅड. पवार यांनी या वेळी सांगितले.

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news