जांभूळवाडी तलावात माशांचा मृत्यू : परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य ! | पुढारी

जांभूळवाडी तलावात माशांचा मृत्यू : परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य !

कात्रज : पुढारी वृत्तसेवा : आंबेगाव खुर्द येथील जांभूळवाडी तलावात शेकडो मासे मृत पावल्याने परिसरात मोठी दुर्गंधी निर्माण झाली आहे. गेल्या दोन वर्षांतील ही तिसरी घटना असून, त्यामुळे तलावाची सुरक्षा रामभरोसे असल्याचे चित्र पुन्हा पाहायला मिळाले. नागरिकांसह पर्यावरणप्रेमींकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. तलावातील जलपर्णीतच मासे सडून गेल्याचे दृश्य समोर आले आहे. तर, महापालिकेकडून काढण्यात आलेल्या जलपर्णीच्या ढिगार्‍याखाली मासे गाडले गेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. तलाव परिसरात वाढलेल्या नागरी वस्तीतील ड्रेनेजचे पाणी दिवसाढवळ्या तलावात सोडले जाते आहे. परिसरात असलेल्या विविध कंपन्या आणि सिमेंट प्लांट यातीलही रसायनमिश्रित सांडपाणी थेट तलावात सोडले जाते. तलावातील पाण्यावर तेलकट तवंग दिसून येत असून, तलावाचे पाणी काळेशार झाले आहे.

रासायनिक फवारणीमुळे माशांचा मृत्यू?

तलावातील वाढलेली जलपर्णी काढण्याचे काम महापालिकेकडून ठेकेदाराला दिले आहे. जलपर्णीची वाढ रोखण्यासाठी किंवा ती नष्ट होण्यासाठी ठेकेदाराकडून रासायनिक फवारणी केली जाते. त्याचा परिणाम जलचरांवर होत असल्याची दबक्या आवाजात चर्चा स्थानिक करीत आहेत. मागील वर्षी ठेकेदाराने हा फवारणीचा प्रयोग केल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. ठेकेदाराच्या कामचुकार भूमिकेमुळे विषबाधा होऊन मासे मेल्याची शक्यता स्थानिक वर्तवीत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

हेही वाचा

Back to top button