कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अंबाबाई मंदिरासमोरचे महाद्वार, धार्मिक विधी होणारा गरुड मंडप आणि पुरातनकालीन महत्त्व असलेल्या मणकर्णिका कुंडाचे संवर्धन केले जाणार आहे. राज्य पुरातत्त्व विभागाकडून मूळच्या रचनेला कोणताही धक्का न लावता हे काम केले जाणार आहे. त्यासाठी देवस्थान समितीच्या निधीतून 21 कोटी 68 लाख रुपये खर्च करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली असून, शुक्रवारी या कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली आहे. 18 महिन्यांत हे काम पूर्ण केले जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने महाद्वार, गरुड मंडप व मणकर्णिका कुंडाच्या दुरुस्ती, संवर्धन आणि सुशोभीकरणाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. महाद्वार म्हणजेच नगारखाना इमारतीच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी 41 लाख 34 हजार 773 रुपये खर्च करण्यात येणार आहे. यातून नगारखान्याच्या सुटलेल्या लाकडी नक्षीकामाच्या कोनाड्यांची नव्याने जोडणी केली जाणार आहे. सध्या हे सर्व सुटल्याने धोकादायक बनले आहे. हे काम शुक्रवारी सुरू करण्यात आले आहे.
गरुड मंडपाच्या दुरुस्तीसाठी 12 कोटी 85 लाख 92 हजार 87 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. गरुड मंडप जुना झाला असून, देवीचे धार्मिक विधी याच मंडपात केले जातात. दर शुक्रवारी तसेच नवरात्र आणि पाच पौर्णिमांना देवीची पालखी निघते. त्यानंतर देवी काही काळ गरुड मंडपातील सदरेवर विराजमान होते, तेव्हा देवीसमोर धार्मिक गीते सादर केली जातात. मात्र, गरुड मंडपाचे खांब निखळले असून, सर्व मंडपाची नव्याने बांधणी केली जाणार आहे.
मंदिराच्या आवारात असलेल्या मणिकर्णिका कुंड मुजवून तेथे महालक्ष्मी उद्यान करण्यात आले होते. आता या कुंडाला पूर्ववत रूप देण्यात येत आहे. तेथे घाट पायर्या तसेच मूळच्या तलावाची रचना कायम ठेवून तेथे असलेल्या मूर्ती आणि काही मंदिरांचे जतन केले जाणार आहे. त्यासाठी 5 कोटी 40 लाख 99 हजार 934 रुपये खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या तिन्ही कामांचे मिळून एकूण 21 कोटी 68 लाख 26 हजार 794 रुपयांच्या खर्चाला मंजुरी मिळाली आहे.
अंबाबाई मंदिरासमोरील गरुड मंडपाची उभारणी 1844 ते 1867 या काळात करण्यात आली. त्या काळात या बांधकामाला 1 लाख रुपये खर्च आला होता. याच ठिकाणी पारंपरिक गणेशोत्सव साजरा केला जातो. तसेच देवीच्या उत्सवमूर्तीवर भाविकांकडून होणारे अभिषेक येथेच केले जातात. मात्र, मंडप धोकादायक बनल्यामुळे सध्या मंदिराच्या आवारात हे अभिषेक होतात.
दांडेलीतील सागवान वापरणार
मंदिराचे धार्मिक आणि पुरातन महत्त्व लक्षात घेऊन त्यासाठी खास दांडेली येथून सागवानी लाकूड गरुड मंडपाच्या खांबासाठी आणले जाणार आहे. यापूर्वीच संबंधित अधिकार्यांनी त्याची पाहणी करून त्याला पसंती दिली आहे.
मंदिर संवर्धनाचा राज्य पुरातत्त्व विभागाच्या सूचना आणि मार्गदर्शनानुसार आराखडा तयार केला आहे. त्यानुसारच राज्य पुरातत्त्व विभाग हे काम पूर्ण करणार आहे. या कामाला मंजुरी मिळावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू होता. त्याचा आदेश झाला असून, वर्क ऑर्डर दिली आहे आणि प्रत्यक्ष कामालाही सुरुवात झाली आहे.
– अमोल येडगे, जिल्हाधिकारी तथा प्रशासक, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती