मानधन तत्त्वावरील कामगारांनी पुकारले बंड; 38 कर्मचारी उपोषणात सहभागी | पुढारी

मानधन तत्त्वावरील कामगारांनी पुकारले बंड; 38 कर्मचारी उपोषणात सहभागी

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा : मोहटा देवस्थान ट्रस्टच्या मानधन तत्त्वावर काम करणार्‍या कामगारांनी बंड पुकारले असून, विविध मागण्यांसाठी मोहटादेवी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कर्मचार्‍यांनी बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. लाल बावटा जनरल कामगार युनियनचे सहसचिव अ‍ॅड. सुधीर टोकेकर, उपाध्यक्ष सतीश पवार, सुभाष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अमोल दहिफळे, धनंजय आव्हाड, मारुती दहिफळे, सतीश दहिफळे, अमोल गायकवाड, राजेंद्र दहिफळे, श्रीधर दहिफळे, भगवान घुले, महादेव घुले, महादेव खेडकर, विठ्ठल दहिफळे आदींसह एकूण 38 कामगार या उपोषणात सहभागी झाले आहेत. येणार्‍या काळात मुख्याधिकारी व कामगारांतला संघर्ष अधिक पेटणार असून, यावर देवस्थान ट्रस्टसह प्रशासन काय भूमिका घेणार याकडे लक्ष लागले आहे.

या उपोषणाबाबत लाल बावटा जनरल कामगार युनियनने जिल्हाधिकार्‍यांकडे लेखी तक्रार करून निवेदन दिले आहे. मोहटा देवस्थानकडे मानधन तत्त्वावर काम करणार्‍या काही कामगारांना दहा-बारा वर्ष झाले आहे. त्यामुळे कामगारांनी ट्रस्टकडून न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. संघटनेचे सहसचिव टोकेकर म्हणाले की, कामगारांच्या मागण्या योग्य असून, त्यांना न्याय हक्क मिळून देवस्थान मुख्याधिकार्‍यांकडून होणारी पिळवणूक थांबवावी. रास्त मागण्यांसाठी कायदेशीर आणि शांततेच्या मार्गाने उपोषण सुरू आहे. एक वर्षांपूर्वी आम्ही या मागण्यांसंदर्भात निवेदन दिले होते. त्यावेळेस आम्ही प्रशासनाच्या विनंतीला मान देऊन त्या वेळी आंदोलन मागे घेतले होते. मात्र, आता कामगारांवर सातत्याने अन्याय होत आहे. तो दूर करण्यासाठी ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीशांनी यातून मार्ग काढावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कर्मचार्‍यांच्या मागण्या

मोहटा देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी हुकूमशाही पद्धतीने वागत असून, त्यांना हटवून कायदेशीर कारवाई होऊन कर्मचार्‍यांना होणारा त्रास बंद झाला पाहिजे, कर्मचारी सेवक सोसायटी पतसंस्थेची चौकशी करावी. सर्व कर्मचार्‍यांना प्रशासनाकडून समानतेची वागणूक मिळावी, मानधन कर्मचारी समयवेतन श्रेणी लागू करून त्रिसदस्य समितीने घेतलेल्या तक्रारीवर कारवाई झाली पाहिजे, अशा मागण्या संतप्त कामगारांनी या वेळी मांडल्या.

येत्या रविवारी (दि. 17) देवस्थानच्या विश्वस्त मंडळाची बैठक असून, या बैठकीत कामगारांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येणार आहे. कामगारांनी उपोषण करू नये, असे पत्र देवस्थान समितीच्या अध्यक्षांनी कामगारांना दिले आहे.

– सुरेश भणगे, मुख्य कार्यकारी अधिकारी, मोहटा देवस्थान

 

Back to top button