पिंपरी : 750 क्षयरुग्णांना घेतले दत्तक; स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीचा हात

पिंपरी : 750 क्षयरुग्णांना घेतले दत्तक; स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांचा मदतीचा हात
Published on
Updated on

दीपेश सुराणा

पिंपरी : प्रधानमंत्री टीबीमुक्त भारत अभियानांतर्गत शहरातील सुमारे 700 ते 750 क्षयरुग्णांना विविध स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते यांनी दत्तक घेतले आहे. त्यांना चांगला आहार मिळावा, यासाठी दर महिन्याला त्यांच्यामार्फत आवश्यक किराणा साहित्य (रेशन कीट) दिले जात आहे. क्षयरोग (टी.बी.) हा आजार बरा होण्यासाठी सरासरी सहा महिन्यांचा कालावधी लागतो. या आजारावर योग्य उपचार केले आणि नियमित औषधे घेतली तर हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, असे मत तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केले आहे.

क्षयरोग म्हणजे काय ?
क्षयरोग हा जिवाणूजन्य आजार आहे. एकेकाळी हा रोग दुर्धर समजला जात असे. सामान्यतः या आजाराला टीबी (ट्युबरक्युलॉसिस) म्हणून ओळखले जाते. हा आजार मायकोबॅक्टेरिया या प्रकारच्या जिवाणूंमुळे होत असतो.

लक्षणे
एखाद्या व्यक्तीला दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ असणारा खोकला, भूक मंदावणे, सायंकाळी वाढणारा ताप, दम लागणे, अशक्तपणा.

महापालिकेकडून उपाययोजना
शहरामध्ये 8 ठिकाणी क्षयरोगाची तपासणी करण्याची व्यवस्था आहे. त्याचप्रमाणे, महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये या आजारावर मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. या आजारासाठी थुंकी तपासणी करण्याची व्यवस्था महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे. त्याचप्रमाणे, त्यासाठी कराव्या लागणार्‍या अद्ययावत वैद्यकीय तपासण्या करण्याची सोय महापालिकेच्या प्रमुख 6 रुग्णालयांमध्ये उपलब्ध आहे.

रुग्ण दत्तक योजना
क्षयरोग झालेल्या रुग्णांना दत्तक घेत त्यांच्या खाण्यापिण्याची काळजी घेतली जाते. तसेच, शासनाने सूचित केल्यानुसार क्षयरोगाचा रुग्ण शोधणार्‍या व्यक्तीला 500 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येतो. राज्य शासनाकडून क्षयरुग्णांना उपचार सुरू असताना दर महिन्याला 500 रुपये पोषण आहार भत्ता दिला जातो. त्याचप्रमाणे, शहरामध्ये आढळणार्‍या क्षयरुग्णांना दत्तक घेण्यासाठी स्वयंसेवी संस्था, सामाजिक कार्यकर्ते पुढे आले आहेत. जवळपास 700 ते 750 क्षयरुग्णांना या माध्यमातून दरमहा किराणा साहित्य (रेशन कीट) पुरविण्यात येत आहे.

आजार कोणाला होऊ शकतो?
हा आजार कोणालाही होऊ शकतो. एड्स, रक्तक्षय, कर्करोग आदी आजार असणार्‍या रुग्णांना या आजाराची लागण होऊ शकते. त्याचप्रमाणे, रोगप्रतिकारशक्ती कमी असणार्‍या रुग्णांनाही हा आजार होऊ शकतो.

काय काळजी घ्यायला हवी?
धूम्रपान आणि मद्यपान करणार्‍यांनी नियमित वैद्यकीय तपासणी करावी.
या आजारासाठी सुमारे सहा महिने उपचार करावे लागतात. त्यामुळे त्यासाठी नियमित औषधोपचार घेणे गरजेचे आहे. नियमित उपचार न घेतल्यास हा रोग पुन्हा बळावू शकतो.

क्षयरोगावर नियमित औषधे घेतल्यास हा रोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र, अर्धवट, अपुरे उपचार घेतल्यास हा रोग पुन्हा बळावू शकतो. त्यामुळे या आजारावर नियमित औषधे व उपचार घेणे गरजेचे आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये क्षयरोगावर आवश्यक अद्ययावत तपासण्या व मोफत उपचारांची सोय उपलब्ध आहे.

                               – डॉ. पवन साळवे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका

क्षयरोगाचे रुग्ण शोधण्यासाठी महापालिकेमार्फत सर्वेक्षण व्हायला हवे. 2025 पर्यंतच्या क्षयरोग निर्मूलनाच्या उद्दिष्टाला साध्य करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. रुग्णांना बरे करण्याची जबाबदारी आरोग्य यंत्रणेने स्वीकारून रुग्णांना नियमित उपचार मिळतील, याची काळजी घ्यायला हवी. शहरात लोकसंख्येच्या प्रमाणात प्राथमिक आरोग्य केंद्र, मान्यताप्राप्त सूक्ष्मदर्शी केंद्राची (मायक्रोस्कोपी सेंटर) संख्या वाढवायला हवी.

           – डॉ. किशोर खिलारे, अध्यक्ष, जनआरोग्य मंच, पुणे जिल्हा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news